गौरव पोंक्षे l माखजन : सोमवारी मध्यरात्री पासून संगमेश्वरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका माखजन बाजारपेठेला बसला आहे.गडनदीच्या पाण्याची पातळी मध्यरात्रीपासून वाढल्याने व्यापाऱ्यांना रात्रभर बाजारात जागून काढावी लागली.अखेरीला सकाळी गडनदीचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
गडनदीच्या पुराचे पाणी थेट दुकानांमध्ये गेल्याने मालाचे मोठे नुकसान झाले आहे.शिवाय माखजन बाजारपेठेचा खालचा भाग ठप्प झाला आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराच्या पाणी पातळीत वाढ झालेली आढळून येत होती.
काही अंशी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला तर काही माल भिजला आहे.
यावर्षी माखजन ग्रामपंचायतीने गडनदीतील मोठ्या प्रमाणात गाळ काढला होता. तरी देखील पुराचे पाणी घुसल्याने येथील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.गडनदीला पूर आल्याने माखजन- कासे हा पूलाच्या दोन्ही बाजूला पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.नदीपालिकडील कासे, कळंबुशी,असावे,नारडुवे व अन्य गावात पूराचा धोका असलेल्या गावातील माखजन हायस्कुल ला येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील खबरदारी म्हणून घरी सोडण्यात आले.











