अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेल्याने मुलांची गैरसोय!!!

ठेकेदार व अधिकारी यांना धरले धारेवर

महिलांना अपशब्द!

दोडामार्ग प्रतिनिधी
आंबडगाव येथील खालचीवाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचा पर्यायी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असता कर्मचाऱ्यांनी तुम्ही अडाणी असे संबोधून हिणवले. या प्रकारामुळे महिला व ठेकेदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण चांगलेच तापले होते यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाची शाखा अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून घेत सर्व प्रकार ऐकविला तसेच महिलांना हिणावल्यास तुमची गय केली जाणार नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

आंबडगाव या ठिकाणी खालचीवाडी व देऊळवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम मंजूर झाले व या कामाला ऑगस्ट महिन्यात कार्यारंभ आदेश मिळाला. पुलाचे काम करताना ठेकेदाराने पर्यायी रस्ता केला. कामाला सुरुवात झाली आणि काम अतिशय संथ गतीने होत राहिले. त्यामुळे पावसाळा येऊनही पुलाचे काम सुरूच होते. रविवारी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलाचा पर्याय रस्ता वाहून गेला व दोन वाड्यांचा एकमेकांशी संपर्क तुटल्याने त्याचे दुष्परिणाम येथील ग्रामस्थांना भोगावे लागले.


कामाला जाणारे, शाळेत जाणारी मुले गावातच अडकून पडली. यावेळी पालकांनी संबंधित विभाग व ठेकेदारावर तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना समजली. ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूने तीव्र उतार आणि मध्ये पाण्यात अर्धवट अवस्थेत असलेला पूल पाहून त्यांनीही संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी नगराध्यक्ष यांना घडलेला प्रकार सागितले ठेकेदाराचा एक कर्मचारी आम्हा महिलांना अडाणी म्हणून हिणावत आहे असे सांगताच नगराध्यक्ष चव्हाण संतापले. त्यांनी संबंधित कर्मचारी व ठेकेदाराचा तेथेच पाणउतारा केला. शिवाय शाखा अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून आजच्या आज रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. तसेच त्यांना जाब विचारत एवढे दिवस काम पूर्ण का झाले नाही? अशी विचारणा केली यावेळी भाजप शहराध्यक्ष राजेश फुलारी, रंगनाथ गवस, पिकी कवठणकर आदी उपस्थित होते.

मुले पहिल्याच दिवशी शाळेत गेली नाही
पर्यायी रस्ता वाहून गेल्याने दोन वाड्यांचा संपर्क तुटला. पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. सोमवारी पहिल्याच दिवशी शाळेला जाण्यासाठी मुले घराबाहेर पडली अन् पुलाच्या एका बाजूला अडकून राहिली. ही घटना पालकांना समजताच ते घटनास्थळी आले. शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मुले पहिल्याच दिवशी शाळेला मुकले. परिणामी पालकांचा संताप अनावर झाला. जिल्ह्यात सर्वत्र शाळेचा पहिला दिवस ढोल ताषांच्या गजरात साजरा केला जातं होता, मात्र आंबडगावात शाळेत जाण्यासाठी पुलावर मुलांच्या पालकांचा संताप पहावयास मिळाला.