घाटातील संरक्षक भिंती ढासळू लागल्याने महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

संतोष कोत्रे l     लांजा -: सोमवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गालगत असणारी संरक्षक भिंत ढासळूण डोंगरावरील मोठ्या प्रमाणावरील दरड व माती खाली येऊन महामार्ग ठप्प झाल्याची घटना वाकेड घाटात घडली होती. त्यामुळे अशा प्रकारे जर संरक्षक भिंती ढासळू लागल्या असतील तर महामार्ग सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यात डोंगर माथ्यावरून खाली येणार्ऱ्या पाण्याचा वेग हा प्रचंड असतो. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या अनेक डोंगरांची मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी डोंगर भागातून वाहणारे अनेक छोटे छोटे ओहोळ असतात. हे ओहोळ उन्हाळ्यात मृतावस्थेत असले तरी

पावसाळ्यात ते पुनर्जीवित होत असतात .या ओहळांचे पाणी हे वेगाने खाली येत असते. डोंगराच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधताना या गोष्टीचा विचार करणे गरजेचे होते.

‌‌ महामार्ग चौपदरी करण्याचा कामात अशा प्रकारे डोंगरांची कटाई करण्यात आल्यानंतर डोंगर माथ्यावरील झाडे, माती व दरड महामार्गावर येऊ नयेत या दृष्टीने महामार्ग ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या डोंगरांच्या ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्यात आलेले आहेत मात्र या संरक्षित भिंती किती तकलादू आहेत, त्यांचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोमवारी मध्यरात्री अशाच प्रकारे वाकेड घाटात बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही पूर्णपणे कोसळून गेली होती. पावसाच्या पाण्याच्या दबावामुळे ही संरक्षक भिंत कोसळूण पडली होती. त्यामुळे डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात माती आणि दरड ही महामार्गावर पडून मुंबई गोवा महामार्ग एका बाजूने पूर्णपणे बंद झाला होता. अशाप्रकारे जर माती आणि दरडींमुळे संरक्षक भिंती कोसळत असतील तर या भिंतींचा दर्जा काय असेल असाही प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.

डोंगरातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे संरक्षक भिंतींवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे वॉल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाकेड सारखी घटना घडत आहे.‌ही बाब प्रशासनाच्या लक्षात येऊनही योग्य उपाययोजना करण्यात हायवे प्रशासन कुचकामी ठरल्याचे चित्र दिसून येते.

दरम्यान, या संरक्षक भिंती ढासळत असतील तर अशा प्रकारच्या दरडी खाली येऊन महामार्ग पूर्णपणे बंद होण्याच्या घटना या वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्ग प्रशासनाने या बाबीने विचार करणे अपेक्षित आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ही महामार्ग प्रशासन घेणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.