७ वर्ष सुगरण सदृश पक्षांचा किलबिलाट
जून ते सप्टेंबर दरम्यान वास्तव्य
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : पिवळसर डोक्याचे आणि पट्टेदार पाठीचे सुगरण जातीतले पक्षी पावसाळ्याच्या दरम्यान गेली ७ वर्षे विजयदुर्ग येथे माजी पं. स. सदस्या शुभा कदम यांच्या घरी येत आहेत. जूनच्या सुरुवातीला साधारण ७०-८० संख्येच्या घोळक्याने हे पक्षी गेली ७ वर्षे येथे येतात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला निघून जातात. यंदाही त्यांचे आगमन झाले असून दिवसभर या परिसरात या पक्षांचा किलबिलाट चालू असतो. यासंदर्भात माहिती मिळवताना असं समजलं की, इंग्रजीमध्ये या पक्षांना Baya Weaver तर शास्त्रीय नाव Ploceus Philippinus आहे. या जातीचे पक्षी स्थलांतरीत नसले तरी हंगामानुसार ते ठिकाण बदलतात. बहुदा विदर्भ, उत्तर कर्नाटक, गोवा या कोरड्या प्रदेशांमधून पावसाळ्यात हे सिंधुदुर्गाच्या काही भागात येतात. धान्य, तांदूळ, किडे आणि बियाणे हे या पक्षांचे खाद्य असून त्यांचे वर्तन खूप एकत्रित आणि समाजप्रिय असतं. म्हणून हे पक्षी समूहाने राहतात. ते संरक्षित नाहीत. पण शेतीत रसायने, वृक्षतोड आणि शहरीकरणामुळे त्यांची संख्या काही भागात कमी होत गेली.
यासंदर्भात बोलताना शुभा कदम यांनी सांगितलं की, गेली ७ वर्षे हे पिवळसर पक्षी आपल्याकडे येत आहेत. त्यांच्यासोबत पूर्ण खरबे आणि छोटे काळे पक्षीही असतात. सकाळी ६ वाजता, त्यानंतर दहाच्या दरम्यान, दुपारी १, सायंकाळी ४ आणि शेवटी स्थानिक मुक्कामी जाण्यापूर्वी सायंकाळी ६ वाजता तांदळाच्या आहारासाठी हे पक्षी येतात. रोज किमान दीड किलो तांदूळ लागत असल्याने सप्टेंबर पर्यंत १३० ते १५० किलो तांदूळ या पक्षाना आहारासाठी लागतात. मात्र विजयदुर्ग मधील नंदू जावकर, युसुफ मुजावर,प्रशांत टुकरूल यासारखे पक्षीप्रेमी काही प्रमाणात तांदूळ देत असल्याने मदत होते. दिवसभर या पक्षांचा किलबिलाट असल्याने वातावरण अतिशय प्रसन्न वाटतं. मात्र जेव्हा सप्टेंबरमध्ये ते पुन्हा निघून जातात तेव्हा काही दिवस पक्षी वावरत असलेला घराबाजूचा परिसर सुनासुना वाटतो अशी प्रतिक्रिया शुभा कदम यांनी दिली.











