मंडणगड शहराचे प्रारुप विकास आराखड्याच्या प्रस्तावित जमीन वापर (पीएलयु)प्रस्तावास नगर रचना कार्यालयाची मंजुरी

नागरीकांनी आपल्या सुचना व हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन. 

मंडणगड /प्रतिनिधी  मंडणगड नगरपंचायतीचे शहराचे प्रारुप विकास आरखड्यासाठी प्रस्तावित जमीन वापर च्या (पीएलयु) (2019-44) प्रस्तावास नगर रचना कार्यालय असिस्टंट डायरेक्टर टाऊन प्लानींग रत्नागिरी यांनी 12 जून 2025 रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार आराखड्याच्या दुरुस्त्यांकरिता तसेच नागरीकांच्या हरकती व सुचनांसाठी प्रस्तावित जमीन वापर प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात प्रकाशीत करण्यात आला आहे.

या विषयी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी 18 जून 2025 रोजी माध्यमांना सविस्तर माहीती दिली आहे. यावेळी नगरसेवक आदेश मर्चंडे, नगरसेविका रेष्मा मर्चंडे, प्रशासकीय अधिकारी लेखाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आरखड्याचे संदर्भातील नागरीकांच्या सुचनांसाठी 12 जुलै 2025 पर्यंतची वेळ निर्धारीत करण्यात आली आहे. शहराचा विस्तार व विकासाच्या दृष्टीने नागरीकांनी केलेल्या सुचना व सुधारणांचा समावेश या आरखड्यात करता येणार आहे. त्यानंतर अंतीम मंजुरीसाठी आराखडा पुढे पाठवण्यात येणार आहे. या आराखड्यात मंडणगड नगरपंचायत हद्दीतील जमीन क्षेत्रफळाची विविध झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार निवासी आरक्षण असलेला झोन, व्यावसाईक आरक्षण असलेला झोन, सार्वजनीक निमशासकीय झोन यामध्ये धार्मिक, शैक्षणीक, आरोग्य, सामाजीक सुविधा, व शासकीय मिळकतींचा समावेश आहे. निवासी झोन मध्ये अम्युसमेंट पार्क, पर्यटक सुविधा केंद्र, गार्डन, क्रीडांगण यांचा जागांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पब्लीक ट्रान्सपोर्टे, वाहतूक, कृषी, औद्योगीक आदी झोनमध्ये शहराची विभागणी कऱण्यात आली आहे. मंडणगड शहरात नगरपंचायतीचे स्थापनेनंतर शहर विकास आरखाड्याअभावी प्रशासकीय पातळीवर नेहमी येणाऱ्या अडचणी आरखड्याच्या मान्यतेनंतर कमी होणार आहेत. विकास आरखाड्याची अनेक वर्षाची प्रतिक्षा या प्रक्रीयेमुळे संपण्यास मदत होणार आहे. शहराचा संभाव्य विस्तार, वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभुत सुविधांचे निर्मीतीसाठी करावे लागणारे प्रयत्न यांचा विचार करता पारुप विकास आराखडा मंजुर होणे ही एक महत्वाचा बाब ठरणार आहे. याचबरोबर आराखड्यात कोणत्या गोष्टीचा अजूनही समावेश करणे गरजेचे आहे अथवा कोणत्या गोष्टी गरजेच्या नाहीत या संदर्भात नागरीकांच्या सुचना, हरकती व दुरुत्या नोंदविल्य जाणार आहे. यासंदर्भात माहीती नागरिकांनी कळावी याकरिता नगरपंचायत प्रशासन विविध पातळीवर व्यापक जनजागृती करत आहे. या संदर्भातील अधिक माहीतीसाठी नागरीकांनी नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन नगरपंचायतीचेवतीने करण्यात आले आहे.