वादळी वाऱ्याचा महावितरण विभागाला सर्वाधिक फटका

नांदगाव हुंबरठ हद्दीत काही विद्युत पोल तुटून कोसळले

सहा तासांच्या प्रयत्नाने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश ; ग्रामस्थांनी मानले आभार

कणकवली : तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव हुंबरठ हद्दीतील महावितरण चे पाच पोल झालेल्या वादळी वाऱ्याने तुटून पडले. यामुळे नांदगाव पंचक्रोशी अंधारात होती.

याबाबतची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान यावेळी वादळी वाऱ्याने तुटलेले आणि मोडून पडलेले विद्युत पोल उभे करून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेरीस सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. विद्युत प्रवाह सुरळीत सुरु झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.