पालीत मोफत कॅन्सर तपासणी

पाली | वार्ताहर
ग्रामीण रुग्णालय पाली येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रत्नागिरी व उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित कॅन्सर (कर्करोग) डायग्नोस्टिक कॅम्पचे आयोजन करण्यात आले. महिला व पुरुष कॅन्सर (कर्करोग) तपासणी अभियान अंतर्गत कॅन्सर (कर्करोग) मोबाईल व्हॅन द्वारे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ख,स्तन व गर्भाशयमुख कॅन्सरच्या (कर्करोग) सर्व तपासण्या या मोफत करण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे उदघाटन प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विकास कुमरे यांचे महत्वाचे योगदान लाभले.या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पाली डॉ.विकास कुमरे यांनी कॅन्सर (कर्करोग)विषयी सविस्तर माहिती दिली सर्वांनी कर्करोग तपासणी करून घ्यावी असे सर्वांना आवाहन केले.त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे यांनी सुद्धा कॅन्सर आजाराविषयी जनजागृती पर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला दंत शल्य चिकित्सक डॉ.शुभदा बडवे मॅडम. एनसीडी जिल्हा समन्वयक डॉ.यश प्रसादे, ग्रा.रू.पालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राम अवतार मीना व डॉ.संजय श्रीखंडे,दंत शल्य चिकित्सक डॉ.पाटील,प्राथमिक आरोग्य केंद्र खानूच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपशिखा,वालावलकर डेरवण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग,पालीचे सरपंच विठ्ठल सावंत,नाणिजचे सरपंच विनायक शिवगण,कशेळीचे माजी सरपंच प्रकाश परपते दशक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक,तपासणीसाठी आलेल्या सर्व महिला व पुरुष,आशा सेविका, रुग्ण व त्यांचे नातेवाईक,ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.