भरदिवसा घडलेल्या प्रकाराने दुर्गवाडी परिसरात खळबळ; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू
मंडणगड(प्रतिनिधी): मंडणगड शहरातील दुर्गवाडी परिसरात एका अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेला संमोहित करून तिच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत दुर्गवाडी परिसरातील श्रीमती कलावती बैकर (वय ७०) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेतील संशयित व्यक्तीचे छायाचित्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. घटनेची माहिती मंडणगड पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
शहरात भरदिवसा वृद्ध महिलेला लक्ष्य करून चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.













