देवगड / प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये दर महिना चांगला परतावा देणारी गुंतवणूक स्किम असल्याचे आमिष दाखवून देवगड, जामसंडे शहरातील महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रद्धा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पहिल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने संशयित श्रद्धा मोंडकर हिला शनिवारी देवगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने संशयित महिलेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. संशयित महिलेबाबत आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ होत असून ही रक्कम २५ लाखाच्या घरात पोहोचली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण एजंट असून शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे दुप्पट करून देतो तसेच जादा परतावा देतो, असे आमिष दाखवून संशयित श्रद्धा मोंडकर हिने देवगड, जामसंडे शहरातील पाच महिलांची सुमारे १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार संशयित श्रद्धा मोंडकर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून देवगड पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर देवगड न्यायालयाने संशयित श्रद्धा मोंडकर हिला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने संशयित श्रद्धा मोंडकर हिला देवगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले. जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित श्रद्धा मोंडकर हिला पुन्हा २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित महिलेने आतापर्यंत सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी देवगड पोलिसांत दाखल झाल्या आहेत. संशयित महिलेकडून अजून कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी देवगड पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी केले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.