नारिंग रे येथे अपघात प्रकरणी मृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

देवगड / प्रतिनिधी

नारिंग्रे – कोटकामते मार्गावर शुक्रवारी झालेल्या अपघातप्रकरणी मृत रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात रिक्षा चालक संकेत घाडी याच्यासह रिक्षामधील एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर एकजण गंभीर जखमी झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास तालुक्यातील नारिंग्रे- कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिक्षाचालक संकेत घाडी याच्यासह संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा मृत्यू झाला होता. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले होते. बिनसाळे याच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. हे सर्वजण आचरा येथील रिक्षाव्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षा बेदारकपणे, हयगयीने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत रिक्षाचालक संकेत घाडी या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद नारिंग्रे पोलीस पाटील संदीप पांडुरंग राणे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.