राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा आणि योग दिन उत्साहात साजरा

राजापूर (वार्ताहर): पतसंस्थेने सभासद भगिनी आणि ग्राहकांच्या पाठिंब्यानेच आजवरची प्रगती साधली असून, सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्याचा संस्थेने नेहमीच प्रयत्न केला आहे. आगामी काळातही पतसंस्था सर्वोत्तम बँकिंग सेवेसाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर यांनी केले.

येथील राजापूर महिला नागरी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा आणि आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा शनिवारी नगर वाचनालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रुती ताम्हनकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या २४ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला.

त्या म्हणाल्या की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आज संस्थेला २४ वर्षे पूर्ण झाली असून, आपण रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती अनिता अभ्यंकर यांनी २१ जून २००१ रोजी काही मैत्रिणींच्या सोबतीने हे छोटे रोपटे लावले होते. आज हे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. आपली आईने या पतसंस्थेची प्रथम सभासद होण्याचा बहुमान पटकाविला आणि तिच्या व अनिता काकूंच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज जवळून पाहताना आपल्याला या संस्थेत संचालक म्हणून काम पाहताना अध्यक्षा पदाची धुरा सांभाळायला मिळाली हे मी माझे भाग्य समजते. या २४ वर्षांच्या प्रवासात संस्थेने गत आर्थिक वर्षात कोंड्ये, आडीवरे आणि पाचल येथे तीन नवीन शाखा उघडून आपल्या पंखांचा विस्तार केला असल्याचे नमूद केले.

रौप्य महोत्सव औचित्यने ९१ दिवस ते १८० दिवस या कालावधी करता ५.५० % व्याज दराची नवीन ठेव योजना रौप्य महोत्सव वर्षा करता जाहीर केली. तिचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रुती ताम्हनकर, प्रमुख पाहुण्या व योग प्रशिक्षिका श्रीमती रमाताई जोग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून रौप्य महोत्सव वर्षाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संचालिका सौ. शिल्पा मराठे यांनी आपल्या मनोगतात ज्या पूर्व काळातील संचालकांनी गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा देऊन व्यवसायात वाढ करण्यासाठी आपले सर्वोत्तम समर्थन आणि समर्पण दिले, त्यांचे प्रयत्न आणि सध्याच्या संचालक मंडळाचे सुशासन यामुळेच आज आपण २५ व्या वर्षात प्रवेश करत असल्याचे नमुद केले. माजी अध्यक्षा सौ. माधवी हर्डीकर यांनीही आपले विचार मांडले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित योग कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुण्या आणि योग क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीमती रमाताई जोग यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी उपस्थितांना अनेक योगासने प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच योगाचे शारीरिक फायदे सांगून ते नियमितपणे केल्यास असाध्य रोगांपासून सहजपण सुटका मिळते. या योग प्रशिक्षणाचे वेळी उपस्थित सर्वांनी मोठ्या उत्साहात यात भाग घेतला आणि योगाच्या अनेक क्रिया शिकायला मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमात संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवपर प्रशंसा पत्रक व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षा सौ. मीना मालपेकर, सौ माधवी हर्डीकर, संचालिका प्रतिभा मराठे, प्रतिभा रेडीज, सौ. गोठणकर, सौ. पटेल यांचेसह विद्यमान उपाध्यक्ष सौ.श्रद्धा धालवलकर, सौ. रसिका कुशे, सौ. शिल्पा मराठे, सौ. शुभांगी सोलगावकर, शितल पटेल, स्नेहा कुवेसकर, सुनीता व्हनमाने, सुधा चव्हाण, सल्लागार प्रसन्न मालपेकर, सचिव प्रेरणा अमरे, शाखाधिकारी सुनीता जाधव, सायली ठाकुरदेसाई, कर्मचारी वृंद पिग्मी एजंट, आर डी एजंट, जयंत अभ्यंकर, राजन रानडे, शेखर अहिरे, अनिल करंगुटकर, सुयोगा जठार, जान्हवी परांजपे, गोखले, मणचेकर, हर्डीकर, ओळकर, सौ. कारेकर, सभासद बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका सौ.सुनीता व्हनमाने यांनी तर आभार सौ. स्नेहा कुवेसकर यांनी मानले.