नवजात अर्भक प्रकरणी कुंभारमाठ ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे पोलीस प्रशासनास निवेदन
मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ म्हाडा कॉलनी जवळील एका आंबा बागेत एक नवजात मुलगी अर्भक तीन दिवसांपूर्वी सापडले होते. असे हीन कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने कसून चौकशी करावी अशी मागणी कुंभारमाठ ग्रामस्थांच्या वतीने मालवण पोलीस प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
दरम्यान, या सर्व प्रकरणाच्या तपासादरम्यान आवश्यक ते सर्व सहकार्य कुंभारमाठ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने केले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.
मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रा.प सदस्य अनिता गावकर, सोनाली डिचवलकर, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, मानसी भोगावकर, सारिखा फोंडेकर, सविता फोंडेकर, संगीता शिंदे, अश्विनी पवार, रश्मी लुडबे, दीपिका आंगणे, स्नेहल बाणे, विजया तेंडुलकर, प्रिया भोगावकर, विजया सिंह परमार, मिलिंद डिचवलकर, देविदास आंगणे, अपेक्षा गुडेकर, प्रशांत गावकर, बाळा माने, आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 20 जुन रोजी कुंभारमाठ गावातील म्हाडा कॉलनी जवळ एका आंब्याच्या बागेमध्ये नवजात मुलगी अर्भक सापडले. या प्रकाराने कुंभारमाठ गावच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. त्यामुळे या हीन प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. हे निंदनीय प्रकार पुन्हा घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष घालून चौकशी करावी. सदर हीन कृत्य करणाऱ्याला कडक शासन् व्हावे असे निवेदनात म्हटले आहे.








