वृद्धाला गंभीर मारहाण, आरोपीला 29 पर्यंत पोलिस कोठडी, अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी

भुवड कुटुंबाचे आमरण उपोषण तुर्तास मागे

गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील वेलदूर येथील घरटवाडीमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने संपूर्ण परिसर दहशतीखाली असल्याचा आरोप पीडित भुवड कुटुंबीयांनी केला होता. याबाबत न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात देखील भुवड कुटुंबियांनी केली.मात्र याप्रकरणी आरोपी पांडुरंग रघुनाथ भुवड यांना 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यामुळे तूर्तास हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.मात्र आरोपी पांडुरंग रघुनाथ भुवड यांनी गंभीर स्वरूपाची मारहाण करूनही त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी फिर्यादी गणपत धाकू भुवड यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.
वेलदूर घरटवाडी येथे गणपत धाकू भुवड (वय ६९) आणि त्यांच्या पत्नी शालिनी भुवड यांच्यावर लाकडी बांबू व लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणपत भुवड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पांडुरंग रघुनाथ भुवड (६०) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर, अजामीनपात्र कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणपत धाकू भुवड यांच्या कुटुंबियांनी प्रजासत्ताक दिनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. यानंतर आरोपींना गुहागर पोलिसांनी अटक केल्यामुळे व फिर्यादी गणपत धाकू भुवड यांची तब्बेत खालावल्याने हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले.यामध्ये आरोपी पांडुरंग रघुनाथ भुवड यांना 29 पर्यंत पोलिस कोठडी तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामागे गुहागर न्यायालयात प्रलंबित असलेला जमिनीचा वाद आहे. न्यायालयात वाद प्रलंबित असतानाही संशयित पांडुरंग भुवड याने तीन कामगारांसह फिर्यादींच्या घरासमोरील बांध फोडण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यावर गणपत व त्यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला, तसेच शिवीगाळ व धमक्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. दरम्यान जर आरोपी यांच्यावर त्यांनी केलेल्या मारहाणीनुसार योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास फिर्यादी यांच्या कुटुंबियांनी आपण पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा दिला आहे.