चिपळूण (प्रतिनिधी) : शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भूतपूर्व कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी काहींना जबरदस्त कानपिचक्या दिल्या. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही संस्था म्हणजे पद पैसा आणि प्रसिद्धीसाठी नसल्याचे त्यांनी सुनावले. त्यांनी दिलेल्या या कानपिचक्यामुळे अनाहूत इच्छुकांचे अवसानच गळाल्याचे चित्र आज सभागृहात लपून राहिले नाही.
वाचनालयाची आजची १६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही अत्यंत महत्त्वाची ठरली. आजच्या या सभेत पंचवार्षिक कार्यकारणी निवडीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे कारणही तसेच होते. या संस्थेत काम न करता काहीजण पदासाठी इच्छुक असून त्यांनी गेले काही दिवस मोर्चे बांधणी सुरू ठेवली होती. गत काही दशकांच्या अविश्रांत परिश्रमाअंती वाचनालयाने विविध मोठे प्रकल्प उभारले आहेत. नव्या काही प्रकल्पांचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेत अलगद पदावर बसण्याचा काहींचा मनसुबा असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. आयतोबांच्या या वृत्तीमुळे सात्विक संतापाने आज मोठ्या संख्येने सभासद या सभेसाठी एकवटले होते. आणि झालेही तसेच. सभासदांचा एकूण पवित्रा आणि उपस्थिती पाहता बिनकामीवृत्तीचे मनसुबे हवेतच विरले. संस्थेत योगदान देणाऱ्या व नवीन पंचवार्षिक कार्यकारिणीसाठी अपेक्षित व्यक्तींची नावे बहुमताने सर्वसंमत झाली. यानंतर संस्थेत वयाच्या ७५ पर्यंत पूर्ण वेळ काम करीत वाचनालयाला सुवर्णकाळ प्राप्त करून देणारे प्रकाश देशपांडे यांनी केलेलं भावनिक संबोधन साऱ्यांना भावलं. ते म्हणाले आम्ही सारे आयुष्य या वाचनालयासाठी खर्ची घातलं. महापुरात आमच्या घरात आठ फूट पाणी होतं तेव्हा आम्ही वाचनालयात काम करत होतो त्यातला चिखल बाहेर काढताना कणकण निवडीत होतो. याचमुळे संग्रहालयातल्या छोट्या छोट्या गोष्टी देखील त्या चिखलातून वाचवता आल्या. परग्रहावरील अनकुचिदार सुईसारख्या छोट्या दगडापासून ते छोट्या सुवर्ण नाण्यापर्यंत सारं काही चिखलातून वेचल आहे. हजारो पुस्तकं पुरात भिजलेली पाहून त्याही परिस्थितीत पुस्तके वाचवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली आहे. कलादालन, वस्तू संग्रहालय, अपरांत संशोधन केंद्र हे आणि असे अनेक प्रकल्प हे एका रात्रीत झालेले नाही; हे लक्षात घ्या. वाचनालय म्हणजे पद, पैसा आणि प्रसिद्धीचे ठिकाण नव्हे तर निरपेक्षवृत्तीने करावयाचे काम आहे. सर्व सभासदांनी एकमुखाने सांगितल्यानंतरही आपण पदावर राहिलो नाही. तरीदेखील वयाच्या ७९ व्या वर्षीही पदावर नसतानाही वाचनालयासाठी काम करतो आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. काम करा आणि मग पद मिळवा असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे इच्छुकांना सुनावले. त्यांच्या या भाषणाला सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे दाद दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेतील सभासदांची उपस्थिती आज लक्षवेधी होती आणि अधिकारी मंडळ व कार्यकारणी निवडीवेळी आवाजी मतदानाने उस्फुर्त अनुमोदनात इच्छुकांचे अवसान गळाल्याचे चित्र आज लोटिस्मामध्ये पहावयास मिळाले.












