शिवतर-नामदरे वाडीकडे जाणारा रस्ता ढगफुटीमुळे खचला बांधकाम सभापती अरुण कदम यांनी केली पाहणी

खेड(प्रतिनिधी) मुसळधार ढगफुटी पावसामुळे शिवतर ते नामदरे वाडीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः खचला असून सध्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरीखोऱ्यातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्त्यालगतच्या नाळ्या आणि मोऱ्या तुंबल्यामुळे रस्त्यावर गाळ आणि माती साचली. परिणामी, या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
या परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण कदम यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून कामाची पाहणी केली. यावेळी शिवतर आणि नामदरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सभापती अरुण कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत या मार्गाची तातडीने डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पावसामुळे झालेल्या इतर नुकसानीचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.