खेड नगरपालिकेत नवीन व्हॅक्युम गाडी दाखल

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खेड नगरपालिकेला आज अत्याधुनिक व्हॅक्युम गाडी प्राप्त झाली असून, या गाडीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला यांच्या हस्ते वाहनाचे विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष बुटाला यांनी सांगितले की, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून, नव्याने दाखल झालेली ही व्हॅक्युम गाडी स्वच्छतेच्या कामात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः गटारे, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
ही गाडी उपलब्ध करून देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उपनगराध्यक्ष श्री. सतीश चिकणे आणि स्वच्छता व आरोग्य सभापती श्री. तौसिफ खोत यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली.
लोकार्पण कार्यक्रमाला शिवसेना गटनेते नगरसेवक श्री. निकेतन पाटणे, बांधकाम सभापती श्री. सुनील दरेकर, समाजकल्याण सभापती श्री. यश खेडेकर, सांस्कृतिक समिती सभापती श्री. भूषण चिखले, महिला व बालकल्याण सभापती सौ. रसिका खेडेकर यांच्यासह नगरसेवक श्री. मिनार चिखले, श्री. स्वप्नील सैतवडेकर, श्री. प्रेमळ चिखले, श्री. अरिफ मुल्लाजी, भाजप गटनेते श्री. रहीम सहिबोले, तसेच नगरसेविका सौ. संजना कुडाळकर, सौ. दीप्ती शिगवण, सौ. रेश्मा खतिब, सौ. अंजुम कुरणे, सौ. स्वप्नाली चव्हाण, उपशहरप्रमुख श्री. तुषार सापते आणि नगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या सुविधेमुळे खेड शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.