नाणीज येथील तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील नाणीज येथे मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादातून बेचैन होउन त्यातून आलेल्या नैराश्यातून युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 24 जून रोजी दुपारी 1 वा. सुमारास उघडकीस आली.
रविंद्र राजेंद्र बेंद्रे (17, रा.नेवासा बुद्रुक ता.नेवासा जि.अहिल्यानगर) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे मामा विकास पोपट म्हसे (रा.नाणीज,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, त्यांचा भाचा रविंद्र बेंद्रे हा गेल्या 20 दिवसांपासून कॉलेजमध्ये शिक्षणासाठी नाणीजला आला होता. रविंद्रला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद होता. या नादातूनच तो बेचैन होउन नैराश्यातून त्याने राहत्या खोलीच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्याचे मामा विकास म्हसे यांना समजताच त्यांनी रविंद्रला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय पाली येथे नेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी रविंद्रला तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे












