जिल्हाधिकारी कार्यालयातील मालमत्ता जप्ती स्थगितीला न्यायालयाची मुदत वाढ

रत्नसागर रिसॉर्ट प्रकरण; 23 जुलै पर्यंत मुदत वाढ

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरानजीकच्या भाटये येथील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मालमत्ता जप्ती स्थगितीला न्यायालयाने आता 23 जुलै पर्यंत मुदत वाढ दिली आहे. यापूर्वी या जप्ती स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयाकडून 25 जून पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. बुधवारी या प्रकरणी जिल्हा न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली.

जप्ती स्थगितीला आता पुन्हा मुदतवाढ मिळाली असून ती 23 जुलैला न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आधी संबंधित रिसॉर्ट मुदतीआधीच जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने झालेले नुकसान भरपाई जिल्हाधिकार्‍यांनी द्यावी अथवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. यानंतर 4 एप्रिल 2025 ला जिल्हा प्रशासनाने तत्काळ स्थगिती मिळविली होती. भाट्ये समुद्रकिनार्‍यावरील रत्नासागर रिसॉर्ट मे 2021 मध्ये जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. मुदतीआधीच रिसॉर्ट बंद केल्याने संबधित मालक प्रतापसिंह सावंत यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने सावंत यांची 9 कोटी 25 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी असे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 4 एप्रिल (शुक्रवारी) सकाळी साडे अकराच्या सुमारास संबंधित प्रकरणाचे आदेश घेवून कोर्टाचे 2 कर्मचारी व तक्रारदार सावंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या आदेशासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आली होती. असेही यावेळी सावंत यांनी सागितले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नुकसानभरपाई द्यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयातील सामान जप्त करण्याच्या आदेशानुसार कारवाईला सुरवात केली. या कारवाईत जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील खुर्च्या आणि संगणक बाहेर काढले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई कऱण्यात आली संबंधित कारावाई संदर्भात तत्काळ स्थगिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. ही कार्यवाही पुढे 16 एप्रिल पर्यत स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाकडून 25 जून पर्यत स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा एकदा 23 जुलै पर्यंत जप्ती स्थगितीसाठी मुदतवाढ दिली आहे