केसरीत दिवसाढवळ्या घरात घुसून १५ हजारांची चोरी

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील केसरी-धनगरवाडी येथे दिवसाढवळ्या एका बंद घरात शिडी लावून चोरट्याने प्रवेश करत कपाटातून सुमारे १५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. मंगळवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरी-धनगरवाडी येथील धुळू मुळू पांढरमिसे यांचे दांपत्य सकाळी कामावर गेले असताना, भरवस्तीत असलेल्या त्यांच्या घराला चोरट्याने लक्ष्य केले. दुपारी अडीचच्या सुमारास सौ. पांढरमिसे घरी परतल्या असता, त्यांना घरातील सामान विस्कटलेले दिसले.

चोरट्याने प्रथम घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने घरामागे असलेल्या शिडीचा वापर करून छतावर चढून घरात प्रवेश केला. कपाटाची चावी तांदळात लपवलेली असतानाही, चोरट्याने ती शोधून काढली आणि कपाट उघडून त्यातील १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच घरातील महत्त्वाची कागदपत्रेही विस्कटून टाकली.

दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच स्नेहल कासले, उपसरपंच संदीप पाटील, ग्रा.पं. सदस्य गुरु कासले, जयानंद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार दीपक शिंदे, रामदास जाधव आणि लक्ष्मण काळे यांनीही घटनास्थळी येऊन तपास केला. हा चोरटा घरातील माहितगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.