दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्या तातडीने उपाययोजना करा: मनीष दळवी

तिलारी जलविद्युत प्रकल्पातून वीज पुरवठा पूर्वी प्रमाणे सुरू करा

दोडामार्ग: सुहास देसाई

तालुक्यात वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्या निवारणार्थ महावितरण अधिकारी व ग्राहक यांच्यात जोरदार तक्रारीवरून आक्रमक पवित्रा घेतला यावेळी उपस्थित ग्राहकांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. कुचकामी अधिकारी आणि कर्मचारी यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. बैठकीला उपस्थित तालुक्यातील ग्राहकांना बसण्यास पुरेशी जागा नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल तरी तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या वीज केंद्रातून तालुक्यात वीज पुरवठा पूर्वी प्रमाणे करावा यासाठी पालकमंत्री ना नितेश राणे यांचे कडे पाठपुरावा करून पंधरा दिवसांत कार्यवाही करण्यात येईल असे मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.

यावर्षी लवकरच पाऊस पडल्याने मोठी गैरसोय झाली होती पावसाळा सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील विद्युत समस्या वाढू लागल्या. वारंवार विजेचा लपंडाव होण्याचे प्रकार घडत असल्याने ग्रामीण भागासहित दोडामार्ग शहरातील ग्राहक हैराण झाले आहेत. वेळोवेळी विद्युत विभागाला ही बाब निदर्शनास आणून देऊनही या समस्या अद्यापही भेडसावत असल्याने विद्युत महामंडळाचे अधिकारी, वीज ग्राहक संघ सिंधुदुर्ग व ग्रहक यांची संयुक्त बैठक दोडामार्ग विद्युत कार्यालयात शुक्रवारी संपन्न झाली. या बैठकीला अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲ. नंदन वेंगुर्लेकर, वीज ग्राहक संघटना दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक दीपक गवस, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, उबाठा शिवसेना तालुकाध्यक्ष संजय गवस, नगरसेवक संतोष नानचे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, रमेश दळवी, भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, सरपंच देवेंद्र शेटकर, शिवसेना विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, सरपंच अजित देसाई, सरपंच सुरेंद्र सावंत, उपसरपंच रत्नकांत कर्पे, सूर्यकांत गवस तसेच तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संखेने उपस्थित होते.

बैठकी दरम्यान ग्राहकांचा रौद्रअवतार अधिकाऱ्यांनी अनुभवला. तालुक्यातील ज्या विद्युत वाहिन्या आहेत. त्या वाहिन्यावर आलेली झाडे झुडपे अद्यापही त्याच स्थितीत आहेत. जीर्ण झालेल्या विद्युत भारीत वाहिन्या जमिनीवर पडत आहेत. ठिकठिकाणी पोल उन्मळून पडत आहेत. आणि, वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत आहे. हे असे प्रकार चालू असताना आपले कर्मचारी काय करतात. येथील अधिकाऱ्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर अधिकारी फोन उचलत नाहीत. अधिकाऱ्यांचा हा भोंगळ कारभार चालू आहे. आज या बैठकीला आपले शाखा अभियंता उपस्थित का नाहीत? लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याची मानसिकता तुम्हा अधिकाऱ्यांची नाही. त्यामुळेच आज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जे काम पावसाळ्यापूर्वी करायला पाहिजे होते, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. अशाप्रकारे तुमचा भोंगळ कारभार चालू आहे. तुम्ही सगळे निष्क्रिय अधिकारी आहात अशी सडेतोड टीका संतप्त वीज ग्राहकाने बैठकीत केली. तालुक्यातील ग्राहक बैठकीला उपस्थित राहणार हे माहीत असताना सुद्धा आपण एखाद्या सभागृहात बैठकीचे आयोजन का केले नाही. इथे उपस्थित अनेक ग्राहकांना उभे राहावे लागत आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांना देखील बसण्यास आपण खुर्ची देत नाही हा तुमचा आदरातिथ्य आहे का? बैठकीचा साधा फोटो काल तुम्हाला समजत नसेल तर अधिकारी म्हणून खुर्चीवर बसू नका असे खडसावून सांगण्यात आले. तुमचे कर्मचारी अधिकारी जर तुम्हाला ऐकत नसतील तर तुम्ही जबाबदार अधिकारी म्हणून आम्हाला उत्तर द्या? अशा प्रश्नांचा भडीमार करतातच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. सर्व जबाबदार राजकीय पदाधिकाऱ्यांच्या तसेच आमदारांच्या समवेत पुन्हा या बैठकीच्या आयोजन करा अशी मागणी ग्राहकांनी केली. त्यानुसार लवकरच त्या पद्धतीने बैठकीच्या आयोजन करण्यात येणार असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ग्राहकाने आपल्या आपापल्या समस्यांचे निवेदने अधिकाऱ्यांकडे सादर केली.

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून समस्या सोडवू : मनीष दळवी
आजच्या बैठकीच्या शेवटी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी या बैठकीदरम्यान भेट दिली. त्यांनी ग्राहकांच्या समस्या जाणून घेत या समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यातील जीर्ण झालेले विद्युत पोल विद्युत वाहिन्या व अन्य साधनसामुग्रीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी पंचाहातर कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.

आजच्या झालेल्या या बैठकीत सत्ताधारी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आम्ही ग्राहक म्हणून आलेलो आहोत. आम्हाला खुर्चीवर बसवू नका. ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करा. असे ठणकावून सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस ,नगरध्यक्ष चेतन चव्हाण, संजय गवस, सागर शिरसाट, आनंद तळणकर आदींनी आक्रमक भूमिका घेतली.

विद्युत महामंडळ अधिकारी आणि ग्राहक या संयुक्त बैठकीत उपस्थित ग्राहकांना जागा अपुरी पडली. अनेक ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या देखील मिळाल्या नाहीत. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी वीज ग्राहक संघटनेच्या तालुकाध्यक्षांना फैलावर घेतले. या बैठकीचे जर आपण आयोजन केले तर आपल्याला कळत नाही का? बैठक या ठिकाणी लावण्याची ही जागा आहे का? ही बैठक आपण सभागृहात का आयोजित केली नाही. अशा शब्दात ग्राहकांनी त्यांचा पान उतारा केला.