चंद्रकांत मोरे यांच्या प्रयत्नांना यश वर्ष भरा साठी पास मंजूर

खेड (प्रतिनिधी) राज्य परिवहन विभागाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिने, त्यानंतर नऊ महिने मोफत प्रवास पास मिळत होता, मात्र हाच मोफत पास वर्षभरासाठी मिळावा यासाठी दापोली आगारातून सेवानिवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांनी प्रामाणिक व रितसर प्रयत्न केल्यामुळेच आता एस. टी. कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास वर्षभरासाठी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत मोरे यांचे विशेष अभिनंदन करून जाहीर आभार मानले आहेत.
बारा महिन्यांसाठी मोफत प्रवासी पास मिळावा व एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेससाठी भाड्यातील फरक न भरता पास ग्राह्य धरावा या मागणीसाठी चंद्रकांत मोरे प्रयत्नशिल होते. त्याप्रमाणे बारा महीन्यांचा मोफत पास प्रदान करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. बहुतांश रा.प. कर्मचारी बंधु-भगिनींना या समस्येला सामोरे जावे लागले. सेवानिवृत झाल्यावर अनेक कारणास्तव पासाच्या मुदतीमध्ये प्रवास करणे शक्य होत नसे. मोरे यांनी बारा महिन्यांसाठी मोफत प्रवासासाठी पास मंजूर केल्यामुळे खूप मोठी सोय झाली आहे.