लोटे-चिरणी-आंबडस मार्गावर अपघातांचे सत्र

 

सहा महिन्यात दोन बळी; बाजूपट्ट्या खचल्या, गटार व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर

खेड(प्रतिनिधी)

 

खेड तालुक्यातील लोटे- चिरणी-आंबडस रस्त्यालगत असणारी झाडे-झुडपे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. या मार्गावर गत सहा महिन्यात झालेल्या अपघातात दोन बळी गेले आहेत. सबंधित ठेकेदार व पंतप्रधान ग्रामसडक कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्यने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात अपघात ‘अथवा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास पर्याय रस्ता म्हणून चिरणी लोटे-आंबडस रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता कळबस्तेमार्गे चिपळूणकडे जाण्यासाठी सोयीचा ठरत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारांनी दोन वर्षांपूर्वी पूर्ण केले असले तरी अजूनही साईटपट्ट्या व गटार व्यवस्था नाही. तसेच रस्त्यालगत झाडे-झुडपे असल्याने
घाटात समोर येणारे वाहन न दिसल्यामुळे मोठे अपघात होत आहेत.

नुकताच माजी उपसभापती तसेच शिवसेना तालुकाप्रमुख मोहन मनोहर आंब्रे यांना दुचाकी अपघातात प्राण गमवावा लागला. तसेच चार महिन्यापूर्वी लोटे येथील घर बांधणारे ठेकेदार येळवी यांनाही प्राण गमावावा लागला होता. अनेक अपघात रस्त्यावर सातत्याने होत असूनही संबंधित ठेकेदार मात्र दुर्लक्ष करत आहे. गटार व्यवस्था न केल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने साईटपट्टधा खचल्या आहेत.

दरम्यान, या रस्त्यावर लोटे एमआयडीसीतील कामगारांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तसेच वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची वेळीच दुरुस्ती करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी जोर धरत असून अन्यया चिरणी, आंबडस तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलनचा इशारा दिला आहे.