राजापूर अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांची एकमुखी भागणी
सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-अध्यक्ष एड. शशिकांत सुतार
१०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
राजापूर प्रतिनिधी : राजापूर अर्बन बँकेमध्ये गेल्या दोन वर्षात निर्माण झालेल्या कठीण आर्थिक परिस्थिवर मात करण्यासाठी सभासदांनी दिलेली भक्कम साथ, संचालक मंडळ व बँक कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नाने बँक पुर्वपदावर येत आहे ही बाब निश्चितच दिलासादाय आहे. मात्र भविष्यातही बँकेच्या आर्थिक उन्नत्तीसाठी थकित कर्ज वसुली प्रकरणी कठोर भूमिका घेत कडक धोरण राबवून कर्ज वसुली करावी, बँकेच्या आर्थिक स्थैर्याला बाधा निर्माण होईल अशी कृती करणारे कर्जदार अथवा बँक अधिकारी वा कर्मचारी यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी रविवारी झालेल्या राजापूर अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत
उपस्थित सभासदांनी केली.
बँकेच्या पडत्या काळात ज्या सभासदांनी बँकेवर दृढ विश्वास दाखविला व बँकेला साथ दिली, आपल्या ठेवी काढल्या नाहीत, त्यामुळेच आज बँक सावरत आहे याचा विचार करून अशा सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी मागणी यावेळी बँकेचे माजी अध्य्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केली.
बँकेच्या पडत्या काळात सभासदांनी दिलेली भक्कम साथ, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे सामूहिक प्रयत्न यामुळेच बँकेने कठीण परिस्थितीतुन मार्ग काढत सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त वसुली करतानाच बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आंम्ही काम करू, सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांनी दिली. तर बँकेच्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे गेली सलग दोन वर्षे सभासदांना लाभांश देता आला नसल्याबद्दल सभासदांची क्षमा मागत यावर्षात बँक फायद्दात आणतानाच पुढील वर्षी सभासदांना लांभांश देणार अशी घोषणाही एड. सुतार यांनी यावेळी केली.
राजापूर अर्बन बँकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर हायस्कुल कलामंदिर सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष विवेक गादीकर,सीईओ शेखरकुमार अहिरे आदींसह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी आपल्या अध्यक्षीय भाषणात एड. सुतार यांनी बँकेच्या एकूणच कामकाजाचा आढावा घेत बँकेच्या प्रगतीसाठी करत असलेलया कामाची माहिती दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला. या सभेतही बँकेच्या थकित कर्ज प्रकरणांवर चर्चा झाली.
३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा बँकेच्या कामकाजाचा अहवाल, लेखापरीक्षित ताळेबंद, नफा-तोटा पत्रक मंजूर करणे, तसेच आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ करीताच्या बँकेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे यावर चर्चा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या पूर्व मान्यतेनुसार पुढील वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक, अंतर्गत व आवर्ती लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे, बँकेच्या पोटनियम दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी देणे आणि वार्षिक व दीर्घमुदती विकास आराखड्यास मंजुरी देणे या विषयांवर चर्चा होऊन मंजूरी देण्यात आली.
थकित कर्ज वसुलीबाबत बँकेने कठोर भूमिका घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी सभासदांनी केली. बँकेच्या आर्थिक स्थैर्याला बाधा होईल असे कृत्य कोण करत असेल तर त्या विरोधात कठोर कारवाई करा अशीही मागणी सभासदांनी केली. रत्नागिरीतील थकित कर्ज प्रकरणी अभिजित राजेशिर्के यांनी प्रश्न उपस्थित करून संबधित बिल्डरवरही कारवाई करा अशी मागणी केली. प्रकाश गुरव यांनी अहवाल मिळाला नसल्याचे नमुद करून बँकेने सभासदांचे हित जोपासावे अशी मागणी केली. तर महादेव गोळवसकर यांनी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह व स्वतंत्र शौचालय व्यवस्थेची मागणी केली. तर बँकेने मुंबईत आपली शाखा सुरू करावी अशीही मागणी त्यांनी केली.
जयप्रकाश नार्वेकर यांनी संचालक मंडळ बँकेच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले. तर ज्या एका संचालकामुळे रत्नागिरी शाखेत गैरव्यवहार झाला, अनेक कर्मचाऱ्यांना त्या संचालकाने धमकाले बँकेच्या आर्थिक स्थैर्याला बाधा होईल असे कृत्य केले,त्या विरोधात कारवाई करत त्याला संचालकपदावरून हटविल्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तर रविकांत रूमडे यांनी सभेची वेळ ही ९.३० ऐवजी ११ ठेवावी अशी मागणी केली. तर जिल्हा बँक संचालक मंदार सप्रे यांनी १०५ वर्षाची परंपरा असलेली ही बँक असून काही कारणांनी ती अडचणीत आली, मात्र त्याही परिस्थितीवर मात करत बँक प्रगती करत आहे, त्यासाठी त्यांना यश येवो, सभासदांचे भक्कम पाठबळ आहेच ते यापुढेही राहील असे नमुद केले.
बँकेचे माजी अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी थकित कर्ज प्रकरणी बँकेने धडक वसुली कारवाई करावी अशी मागणी केली. तर सीईओ शेखरकुमार अहिरे यांची मुदत ही सहा महिन्यात संपत असली तरी बँकेने त्यांना सोडू नये, कारण या थकित कर्ज प्रकरणाची त्यांनाच योग्य प्रकारे माहिती आहे, कर्जदारांची माहिती आहे, त्यामुळे ते वसुल करू शकतात असे नमुद केले. आंम्ही सभासद तरी ही थकित कर्ज वसुली होईपर्यंत अहिरे यांना सोडू देणार नाही अशी रोखठोक भूमिका काझी यांनी मांडली. तर नवीन सीईओकडूनही योग्य काम झाले नाही तर त्याचा जाब विचारू असा ईशाराही त्यांनी दिली. बँकेच्या पडत्या काळात अनेक सभासदांनी आमच्या तसेच बँक कर्मचारी यांच्या शब्दावर विश्वास ठेवत आपल्या ठेवी काढल्या नाहीत, बँकेवर विश्वास दाखविला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, बँकेला प्रगतीपथावर न्या सभासद तुमच्या पाठीशी आहेत असे काझी यांनी नमुद केले. यावर अध्यक्ष एड. सुतार यांनी आपल्या सुचनांचे नक्कीच पालन केले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत उल्हास खडपे, प्रभात पाध्ये, प्रसन्न मालपेकर, प्रमोद सुर्वे यांसह अन्य सभासदांनीही अहवालावरिल चर्चेत सहभाग घेत आपली मते मांडली.
अध्यक्ष एड. सुतार यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देत समाधान केले. बँकेच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, सभासदांचे हित आणि बँकेचे स्थैर्य महत्वाचे असून भविष्यात नक्कीच बँक प्रगती करेल असा विश्वास यावेळी सभासदांना दिला.
आभार संचालक अनिलकुमार करंगुटकर यांनी मानले. याप्रसंगी सर्व संचालकांसह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी दिवंगताना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.












