आंबोली रेस्क्यू ग्रुपला शासनाकडून अत्याधुनिक बचाव साहित्य

सरपंचांकडून पालकमंत्र्यांसह आ. केसरकर यांचे आभार

आंबोली : आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेलीला आपत्कालीन बचाव साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दीपकभाई केसरकर आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. गेली अनेक वर्षे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत शोध व बचाव कार्य करून अपघातग्रस्तांना आणि प्रशासनाला मदत करणाऱ्या या ग्रुपला हे साहित्य ‘चांदा ते बांदा योजना’, जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यामार्फत देण्यात आले आहे.

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या बचाव साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, एनडीआरएफ कमांडर आर. जे. यादव, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या साहित्यामुळे सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यू ग्रुपचे सदस्य शोध व बचाव कार्य करताना स्वतःची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकणार आहेत, ज्यामुळे ते प्रशासन आणि अपघातग्रस्तांना अधिक प्रभावीपणे सहकार्य करू शकतील.

आंबोली घाट परिसरात जेव्हा जेव्हा अपघात होतात, तेव्हा सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेलीचे मोठे योगदान असते. या टीमचे सदस्य कोणताही शासकीय मोबदला न घेता निःस्वार्थपणे आणि अविरत जनसेवा करत आहेत. हे शोध व बचाव साहित्य या टीमला आणि प्रशासनाला येणाऱ्या काळात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एखाद्या शोध व बचाव टीमला एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असल्यामुळे, हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेल्या आमदार दीपकभाई केसरकर, पालकमंत्री ना. नितेश राणे आणि महायुती सरकारचे सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.