आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याकडून दखल
दोडामार्ग रुग्णालय येथे भेट देत केली विचारपूस
दोडामार्ग :सुहास देसाई
दोडामार्ग-आयी मार्गावरील माटणे काटा येथे दोन दुचाकींचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मये (गोवा) येथील एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की , माटणे काटा परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
जखमींवर उपचार सुरू
स्थानिकांच्या मदतीने अपघातातील तिन्ही गंभीर जखमींना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.
मये गोवा येथील
आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याकडून दखल
या भीषण अपघाताची माहिती मिळताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी तात्काळ घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी दोडामार्ग येथे जखमींच्या प्रकृतीबाबत आणि वैद्यकीय उपचारांविषयी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून विचारपूस केली असून आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे.













