आंबोली हाऊसफुल्ल!

पर्यटकांची तोबा गर्दी: घाटात दोन तास ‘ट्रॅफिक जाम’

आंबोली | प्रतिनिधी: वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य आंबोलीत रविवारी मुख्य धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली. पावसाचा जोर नसतानाही सिंधुदुर्ग, गोवा, आणि कोल्हापूर येथून आलेल्या पर्यटकांनी आंबोलीला अक्षरशः वेढले होते, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही अक्षरशः हतबल व्हावे लागले, परिणामी सुमारे दोन तास वाहतूक कोंडीचा फटका बसला. अखेर, पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाल्यावर पर्यटक आणि वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

रविवारी मुख्य धबधब्याच्या परिसरात वाहनांच्या रांगा दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या, तर बाजारवाडी येथेही एक किलोमीटरपर्यंत वाहनांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे, शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी आंबोली पर्यटन स्थळांना भेट देऊन मुख्य धबधब्याच्या ठिकाणाची पाहणी केली होती. असे असतानाही घाटातील वाहतूक कोंडीमुळे एस.टी. वाहतूक एक ते दीड तासाने उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अतोनात हाल सोसावे लागले. दुर्दैवाने, याच वाहतूक कोंडीचा फटका एका अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वारालाही बसला, ज्यावर “याला जबाबदार कोण?” असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

पावसाळी वर्षा पर्यटनाचा हा तिसरा रविवार होता आणि या दिवशी गर्दी अपेक्षित असल्याने तसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. परंतु, नेमका याच बंदोबस्तातील काही कर्मचारी गैरहजर राहिल्याने पर्यटकांच्या तुफान गर्दीने आणि वाहनांमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले. दुपारी बारा वाजेनंतरच वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे, फॉरेस्ट नाका येथे घाटात मुख्य धबधब्याकडे जाणारी वाहतूक थांबवून येणाऱ्या पर्यटकांची वाहने चौकुळ रस्ता, ग्रामपंचायत पार्किंग आणि एम.टी.डी.सी. पार्किंग येथे पार्क करण्यात आली. केवळ सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना मार्ग दिला गेल्याने मुख्य धबधबा परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी टाळता आली.

मात्र, दुपारनंतर इतर ठिकाणांहून आलेले पर्यटक मुख्य धबधब्याच्या ठिकाणी एकत्र आल्याने पुन्हा वाहतूक कोंडी झाली. हजारोच्या संख्येने येणारी वाहने रोखण्यास पोलीसही हतबल झाले, कारण रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांच्या गाड्या उभ्या असल्याने मोठ्या वाहनांना मार्ग काढणे अशक्य झाले होते. परिणामी, दुपारनंतर एक ते दीड तास घाटात ‘ट्रॅफिक जाम’ झाला होता. पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर ही वाहतूक मोकळी केली. पर्यटकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे आणि चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांमुळेच ट्रॅफिक कोंडी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे, पोलिसांनी पुढील रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी योग्य नियोजन करावे, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि वाहनधारकांनी केली आहे.

कावळेसाद पॉईंट सायंकाळी पाच नंतर बंद: पर्यटकांचा हिरमोड
कावळेसाद पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पर्यटकाच्या दरीत कोसळून झालेल्या मृत्यूनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी पाच वाजेनंतर कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असली तरी, यामुळे पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. असे असले तरीही, कावळेसाद पॉईंटवर होणारे जीवघेणे प्रसंग टाळण्यास यामुळे मदत होणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. तसेच, यापूर्वी घडलेले प्रसंग टाळण्यासाठी देखील प्रशासनाने अधिक खबरदारी व सक्त उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे.