सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या प्रमुखपदी महिन्याभरापूर्वीच डॉ. मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारला आहे. ठाणे शहर उपायुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ. मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर जिल्ह्याच्या पोलीसदलात अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केला आहे. अनेक तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिस प्रभारी निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये कणकवली पोलिस स्टेशनच्या प्रभारी पदावर यापूर्वी जिल्ह्यात काम केलेल्या अतुल जाधव यांची नियुक्ती केली आहे. मालवण प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून मारूती जगताप यांनी कार्यभार स्विकारला आहे. विजयदुर्ग पोलिस स्टेशनला सावंतवाडीत कार्यरत असणाऱ्या संजय कातिवले यांच्याकडे पोलिस प्रभारीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. विजयदुर्ग पोलिस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या मनोज सोनवलकर यांच्याकडे वैभववाडी पोलिस स्टेशन प्रभारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
बांदा पोलिस स्टेशन प्रभारी म्हणून गजेंद्र पालवे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हा विशेष शाखेचा कारभार विलास बडवे यांच्याकडे दिला आहे. तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात मालवणचे पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कणकवली पोलिस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या पोलिस निरीक्षक अनिल हाडळ यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. काही पोलिस स्टेशनचे प्रभारी बदलले हे खरं मानलं तरीही बदलल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्या-त्या पोलिस स्टेशनचा कारभार सुधारला पाहिजे. न्यायाच्या अपेक्षेने पोलिस स्टेशनला येणाऱ्या सर्वसामान्य माणसाच खरोखरच पोलिस स्टेशनला कोणी ऐकूण तरी घेतो का ? हाच खरंतर फारमोठा जसा संशोधनाचा विषय आहे तसा तो पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी विचार करावा असाही आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळ ‘बीट’ पहाणाऱ्या पोलिस हवालदारांची बदली व्हायलाच हवी. एकाच जागी एकाच तालुक्यात सात-आठ वर्षे पोलिस कर्मचारी राहिल्यास त्यांचं काम कर्तव्यदक्षतेने होत नाही. ज्या बीटमध्ये बीट हवालदारांची मनमानी चालते त्याबद्धलही पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची निश्चितच आवश्यकता आहे. प्रत्येक घटनेत, गुन्ह्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याची जी नवी कार्यपद्धती विकसित होत चालली आहे त्यालाही आळा बसला पाहिजे. सिंधुदुर्गात महाराष्ट्राच्या तुलनेत ‘क्राईम’ फार कमी आहे हे ऑन रेकॉर्ड खरं असलं तरीही पोलिस स्टेशनला सामान्य माणूस ज्या अपेक्षेने जातो किमान त्याला काय म्हणायचं आहे त्याची वेदना काय आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्या सामान्य माणसासाठी खरोखरीच प्रामाणिकपणे काही करण्याची मानसिकता असणारे कोणीच नाहीत असं मुळीच नाही. खाकीवर्दीतही अनेक सहृदयी आहेत. परंतु या सगळ्या बदलामध्ये पोलिस स्टेशनला असणाऱ्या ठाणे अंमलदारांनी येणाऱ्याच किमान एेकून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. पोलिस मित्र, पोलिस संवाद, जनतेशी मित्रत्वाचे नातं आदी अनेक उपक्रम कागदावर आणि एखादा फोटो पुरते छान वाटतात. परंतु प्रत्यक्ष जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा निश्चितच ज्यांना-त्यांना येणारा अनुभव फार सुखद आणि आनंददायी नसतो. त्यामुळे सिंधुदुर्गातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जिल्ह्यातील फक्त त्या-त्या पोलिस स्टेशनच्या प्रभारी पदावर एक व्यक्ती जाऊन दुसरी व्यक्ती विराजमान झाली असं होऊ नये. प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची अशी एक खास पद्धती असते. ती बदललेल्या कार्यपद्धतीतून दिसायला हवी. पोलिस दलातील स्थानिय गुन्हा अन्वेषण विभाग हा तसं म्हटलं तर खास विभाग आहे. अनेक न उजेडात आलेले आणि पोलिस तपास होणारच नाही, गुन्हेगार सापडणारच नाहीत असं वाटत असतानाच स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागाची चांगली कामगिरी जनतेसमोर येत रहाते.
ओसरगांव येथे एका महिलेची झालेली हत्या या प्रकरणात कोणतेही धागेदोरे हाती नसताना एलसीबीने जी कामगिरी केली होती ती कौतुकास्पदच होती. याच स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागात आता प्रविण कोल्हे आणि पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची नियुक्ती झाली आहे. कणकवली पोलिस स्टेशनमधील अनेक गुन्हे तपासात पो.उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ऑनलाईन फसवणुक असेल किंवा चोरी प्रकरण असतील या सर्वांमध्ये पो.उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामुळे निश्चित स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागातही ते कर्तव्यदक्षतेने काम करतील. सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर येत्या काळात सिंधुदुर्ग पोलिस दलाची विश्वासार्हता वाढण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील. सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांप्रती विश्वास वाढेल, पोलिस स्टेशन प्रभारींचा कारभारही सुधारेल अशीच अपेक्षा आहे… !













