चिवेली विद्यालयात शैक्षणिक कार्यशाळा संपन्न

आनंदाचे डोही, महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल व करवंटी हस्तकला मार्गदर्शन

 

चिपळूण (वार्ताहर ) : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर,चिवेली या विद्यालयात ‘आनंदाचे डोही’ कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चव्हाण होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक व सेवा साधना प्रतिष्ठानचे विनीत वाघे यांनी आपल्याला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डोपमाइन,सोरोटोनीन,ऑक्सिटोसिन व इंडोरफिन ही रसायने कशी मिळवायची यावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात ‘महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल ‘ याबाबत थ्री डी मॅप द्वारे मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या सत्रात ‘करवंटी हस्तकला’ कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांना नारळाच्या करवंटी पासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः करवंटीपासून बाउल, मोबाईल स्टॅन्ड, की चेन, कानातील रिंग आदी वस्तू बनवल्या.

यावेळी मुख्याध्यापक संजय चव्हाण,सेवासाधना प्रतिष्ठान चे विनीत वाघे, हस्तकला प्रशिक्षक शुभम लिबे, ज्येष्ठ शिक्षक नितीन गुरव, महेश चव्हाण, शैलेश आंबरे, रियाज अत्तार, अक्षय साळवी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.