चिपळूण (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय सोनवडे येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महात्मा फुलेंच्या विचारांचे संवर्धन करून विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना व्हावी, या उद्देशाने वर्षभरात हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ‘जलसंवर्धन अभियान’ (रेन वॉटर हार्वेस्टिंग) व ‘शाळा स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. सामाजिक न्यायाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत वक्तृत्व, चित्रकला, निबंध, रांगोळी व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी म्हणून आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्त्री सक्षमीकरण उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय देवरुखच्या डॉ. प्राजक्ता खातू व समुपदेशक वैशाली पुजारी यांनी उपस्थित राहून किशोरवयीन विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले। याशिवाय, शाळेत विज्ञानविषयक प्रयोग व उपक्रम पार पडले. तसेच ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ व महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामधून विद्यार्थ्यांना अनेक प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करण्याची संधी मिळाली.
दरम्यान, शाळेचे उपक्रमशील हिंदी अध्यापक, क्रीडा समन्वयक अभिजीत कदम यांना संगमेश्वर तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शाळेत विशेष सन्मान करण्यात आला. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













