महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी-चिंचघरी सती विद्यालयात विविध उपक्रमांचा जागर

चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती), ता. चिपळूण येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती महोत्सवानिमित्त (द्विशताब्दी वर्ष) विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम उत्साहात संपन्न झाले.
मुख्याध्यापक संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, समानता आणि नैतिक मूल्यांची रुजवण करण्यासाठी हे सर्व उपक्रम राबविण्यात आले. विद्यालयात महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच समाजप्रबोधनासाठी ‘शाळा ते सती नाका’ दरम्यान भव्य जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती व्हावी या उद्देशाने बालसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रंथपाल जे. व्ही. पवार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.
महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमदानातून विद्यालयाचा परिसर, वर्ग आणि बागेची स्वच्छता केली. तसेच तण व गवत काढून स्वच्छतेचा प्रत्यक्ष संदेश दिला. समता सप्ताहाच्या अंतर्गत इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व चर्चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केतकी दाभोळकर (प्रथम), सुयश पवार (द्वितीय) आणि अंश कुलकर्णी (तृतीय) यांनी यश संपादन केले. ‘समाजसेवा व राष्ट्रभावना’ जागृती मोहिमेंतर्गत राष्ट्रीय हरित सेना व एम.सी.सी. (MCC) च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विद्यालयाच्या आवारात आणि परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना घरोघरी लावण्यासाठी रोपांचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘महात्मा फुले साहित्य वाचन अभियान’ राबविण्यात आले, ज्यामध्ये प्राथमिक ते माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मुलींना समान संधी, अधिकार आणि स्वावलंबनाची जाणीव व्हावी यासाठी विशेष प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रबोधनात्मक भूमिका अभिनय (Role Play), नाटिका आणि कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती सादर केल्या.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व स्थानिक आमदार शेखर निकम यांनी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. बोर्ड परीक्षा, स्कॉलरशिप, नवोदय व इतर विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव केला. उपस्थितांचे सहकार्य: या संपूर्ण उपक्रममालेमध्ये मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप, उपमुख्याध्यापक विजय कासार, पर्यवेक्षक श्री. गावडे, पर्यवेक्षिका संजाली सावंत, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व पालकांकडून विद्यालयाचे कौतुक होत आहे.