शिक्षक व पदवीधर आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गौरव पोंक्षे l माखजन : गतवर्षी १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २०% अनुदानाचा टप्पा देण्याचा शासन निर्णय झाला.व १४ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला.
संबंधित निर्णय होऊन आठ महिने व तिसरे अधिवेशन सुरू झाले आहे.तरी अद्याप शासनाने आर्थिक तरतूद केलेली नाही.३० जून रोजी सुमारे ५८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या .शासन निर्णयानंतर तिसऱ्या अधिवेशनात देखील तरतूद न झाल्याने शिक्षक वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक व पदवीधर आमदार देखील आक्रमक झाले आहेत.आज अधिवेशन काळात अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेतली.व १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्प्यासाठी निधी देण्यासाठी तात्काळ बैठक आयोजित करा असे सांगत,निवेदन दिले.
यावेळी शिक्षक व पदवीधर आमदारांनी,तिसरे अधिवेशन सुरू होऊन देखील निधी ची तरतूद न झाल्याने राज्यात सुमारे ७० हजार शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती सांगितली.या शासन निर्णयाच्या अमलबाजवणी करीता शिक्षक भर पावसात आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली आंदोलन करत असल्याचे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून दिले.शासन निर्णय होऊन देखील ,इतके महिने उलटले तरी निधी दिला जात नसल्याने, शिक्षकांवर शासनाकडून अन्याय होत असल्याची बाब मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.
या सर्व गंभीर बाबींवर मुख्यमंत्र्यांनी शिक्षक व पदवीधर आमदारांसोबत तात्काळ बैठक घ्या व यातून मार्ग काढा असे शिक्षक व पदवीधर आमदारांकडून सांगण्यात आले.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतो असे आश्वासित केले आहे.आता राज्यातील व आझाद मैदानावर बसलेल्या तमाम अंशतः अनुदानित शिक्षकांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षक आमदार,पदवीधर आमदारांच्या बैठकीकडे लागले आहे.
दरम्यान यावेळी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आ निरंजन डावखरे,आ.ज.मो.अभ्यंकर,आ. किरण सरनाईक,आ.जयंत आसगावकर,आ.सतीश चव्हाण आदींसह अन्य शिक्षक व पदवीधर आमदार उपस्थित होते.











