मुंबई : ड्रग तस्करी प्रकरणी अटक केलेल्यांवर मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ड्रग तस्करांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मोठ्या प्रकरणांमध्ये जलद सुनावणी न्यायालय अर्थात फास्ट ट्रॅक कोर्टांची व्यवस्था करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेवू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात इतर राज्यातून देखील ड्रगची तस्करी होते. मध्यप्रदेश गुजरात इथून जळगाव मुक्ताई नगर येथे आणि मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवर अफू आणि गांजा याची तस्करी होते. या प्रकरणात तस्करांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. राज्यात मेफेड्रॉन (MD) तस्करीचे प्रमाण वाढले; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. मागील पाच वर्षात राज्यात ९५२३ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन (MD) आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. तब्बल ५१५२ किलो मेफेड्रॉन (MD) जप्त करण्यात आले आहे. राज्यात मेफेड्रॉन (MD) संदर्भात २०२२ मध्ये ३०३ गुन्हे, २०२३ मध्ये ६४२ गुन्हे आणि २०२४ मध्ये ५४५ गुन्हे नोंदवले आहेत; असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.










