खवटी गावात जल जीवन मिशनअंतर्गत बांधलेल्या विहिरीत दूषित पाणी; ३० कोटींचा खर्च वाया

खेड : खेड तालुक्यातील खवटी गावात केंद्र शासनाच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत २०२२ साली जल जीवन मिशनच्या माध्यमातून नवीन विहीर बांधण्यात आली. या विहिरीच्या कामासाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. विहीर सिमेंट काँक्रिटने बांधण्यात आली असून, ही योजना गावातील प्रत्येक घरी स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना अपयशी ठरली असून गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विहिरीच्या अगदी काही अंतरावरून नदी वाहते, आणि या नदीतील पाणी थेट विहिरीत झिरपले आहे. परिणामी विहिरीतील सर्व पाणी दूषित झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सध्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी वापरण्यायोग्य नाही. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दूषित पाणी पिल्यामुळे गावातील लहान मुले, महिलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण पोटदुखी, उलट्या, ताप, अशक्तपणा यांसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. येत्या काळात आणखी गंभीर आरोग्य धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, यामुळे ही योजना अपयशी ठरली असून लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे खवटी गावातील नागरिक अस्वस्थ आहेत. “पाणी जीवन आहे” असे म्हटले जाते, पण जर दूषित पाणीच मिळाले तर आरोग्याचे मोठे संकट ओढवू शकते. त्यामुळे प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.