चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या पाणीपुरवठा लाईन, वीजपुरवठा लाईन व गॅस पाईपलाईच्या कामांची त्रयस्त शासकीय संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नित्यानंद भागवत यांनी केली आहे.
चिपळूण शहरातील महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नवीन पाणीपुरवठा लाईनचे काम एप्रिल-मे २०२१ पासून सूरु असून, आजतागायत पूर्ण झालेले नाही. नवीन सर्व पाणीपुरवठा लाईन एक वर्षापूर्वी टाकून झाल्या असून देखील त्यांची प्रेशर टेस्ट अजूनही घेण्यात आलेली नाही. फक्त लिकेज टेस्टिंगसाठी पाणी सोडले असता जवळजवळ ६-७ ठिकाणी लिकेज आढळले आहे. मग याच पाणीपुरवठा लाईनची प्रेशर टेस्ट घेताना काय अवस्था असेल? या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खाते देखरेख करीत आहे. सदर पाणीपुरवठा लाईनची कामे सुरु असताना कधीही या विभागाचे अधिकारी साईटवर दिसलेले नाहीत. म्हणूनच या पाणीपुरवठा लाईनचे काम ४ वर्षापूर्वी सुरु होऊन सुद्धा अजूनही पूर्ण झालेले नाही. सरकारची इच्छा असून सुद्धा फेडरल बँक ते सीता निवास लॉज दरम्यानचे काम त्यामुळे पूर्ण करता येणार नाही, तसेच प्रांत ऑफीस शेजारील नाल्यातील जुन्या पाणीपुरवठा लाईन चालू असल्याने नाल्यावरील मोरीचे काम पूर्ण होऊ शकणार नाही. अनेकवेळा जुन्या पाणीपुरवठा लाईन मुख्य रस्त्याचे काम करताना फुटत असतात, त्यावेळी एक ते दोन दिवस पाणीपुरवठा खंडित होतो. गेले महिनाभर प्रांत ऑफीस समोर एक पाणीपुरवठा करणारी जुनी लाईन लिकेज आहे, ते लिकेज देखील सातत्याने संबंधित विभागाजवळ संपर्क करुन सुद्धा या गळतीकडे लक्ष दिलेले नाही. या विषयात अनेकवेळा नगर परिषद प्रशासनाने देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. या पाणीपुरवठा लाईनवर काही ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या असून त्या प्रवाहित करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा लाईनवर विजेचे पोल उभे केले आहेत. गटारातून वीज वाहिन्या टाकल्या आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांच्या ठिकाणी योग्य अंतरावर त्याची माहिती देणारे पोल उभे केलेले नाहीत. या वीजवाहिन्यांच्या कामावर महावितरण देखरेख करीत होती. तसेच यात भर की काय म्हणून शिवाजीनगर बसस्थानकशेजारील सीएनजी पंप ते अभिषेक हॉटेल गल्ली गॅस पाईपलाईन देखील टाकली आहे. माझ्या कडील खात्रीलायक माहितीनुसार महामार्गशेजारील गटार व ROW लाइन दरम्यान असणाऱ्या उपलब्ध भागातील जागेत पाणीपुरवठा लाईन, वीजवाहिन्या व गॅस पाईपलाईनचा एकत्रित नकाशाच अस्तिवात नाही आहे. या संदर्भात १ मे २०२२ रोजीच्या उपोषणानंतर झालेल्या सर्व विभागाची संयुक्त पाहणी करण्यात आली, त्यावेळी ठरलेल्या गोष्टींची अद्याप पूर्तता झालेली नाही. भविष्यात या चुकीच्या कामांमुळे दुरुस्तीच्या वेळी मोठा अपघात होऊन मनुष्यहानी होऊ शकते. ती टाळण्यासाठी आपण चिपळूण शहरातील महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या पाणीपुरवठा लाईन व वीजपुरवठा लाईनच्या कामांची त्रयस्त शासकीय संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आग्रही मागणी आहे. या पत्रासोबत आपण संबंधित सर्व विभागाजवळ केलेला पत्रव्यवहार, संबंधित विभागाची माझ्या पत्रव्यवहाराला मिळालेली उत्तरे व संयुक्त पाहणी अहवाल या सर्वांची झेरॉक्स प्रत जोडल्या आहेत. आपण या गंभीर विषयात लक्ष घालून भविष्यातील अपघात व मनुष्यहानी टाळावी, अशी आग्रही मागणी जागरुक नागरिक नित्यानंद भागवत यांनी केली आहे.













