मंडणगड प्रतिनिधी : चवदार तळे सत्याग्रहाला 2027 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याच वर्षी समता सैनिक दलाच्या स्थापनेलाही शताब्दी पूर्ण होत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील या ऐतिहासिक घटनांना विशेष महत्त्व आहे. नव्या पिढीने आपल्या पूर्वजांचा संघर्ष आणि इतिहास जाणून घेऊन तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. धम्म चळवळ गतिमान करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केले. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेच्या माध्यमातून 10 नोव्हेंबर 2026 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे प्रथमच बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धम्ममय वातावरणात मोठ्या उत्साहात ही परिषद संपन्न झाली. याच निमित्ताने मंडणगड येथे 9 व 10 नोव्हेंबर असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचीही सांगता झाली. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भीमराव आंबेडकर बोलत होते. यावेळी डॉ. भीमराव आंबेडकर यांनी श्रामणेर शिबिराचे महत्त्व आणि वर्तमान काळातील त्याची आवश्यकता विशद केली. तसेच आगामी 2027 च्या जनगणनेमध्ये बौद्ध समाजाने कोणत्या पद्धतीने माहिती नोंदविणे आवश्यक आहे, उपवर्गीकरणाचा विषय आणि आजची सामाजिक परिस्थिती अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सभापती रवींद्रनाथ धात्रे, विद्यमान अध्यक्ष सुभाष तांबे, दादासाहेब मर्चंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष आनंद सावंत गुरुजी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या परिस्थितीत जगामध्ये धार्मिक कामकाज करणारी एकमेव संघटना म्हणजे भारतीय बौद्ध महासभा असून, या संस्थेच्या माध्यमातून समाजाने धार्मिक कामकाज करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पूज्य भदंत डॉ. ए. सुमेध बोधी यांनी धम्मदेसना देत उपस्थितांना आशीर्वाद व मंगलकामना दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळ तालुकाध्यक्ष हर्ष जाधव होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अल्पेश सकपाळ यांनी केले. या धम्म परिषदेला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.













