मेहनत, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा नवा प्रवास; गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात रंगणार दिमाखदार सोहळा
मंडणगड (प्रतिनिधी) : अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि मनात जपलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने नटखट प्रोडक्शन्सने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नटखट प्रोडक्शन्सच्या पहिल्या मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, यानिमित्ताने भव्य पोस्टर अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेतून नटखट प्रोडक्शन्सने आपल्या संघर्षमय प्रवासातील भावना व्यक्त केल्या आहेत. ‘एक स्वप्न होतं… जे फक्त डोळ्यांनी नाही, तर काळजाने पाहिलं होतं. घामाच्या प्रत्येक थेंबाने, मेहनतीच्या प्रत्येक क्षणाने आम्ही आमचं नशीब स्वतः घडवलं. आज तेच स्वप्न, तुमच्या आशीर्वादाने सत्यात उतरवत आहोत,’ अशा भावनिक शब्दांत या नव्या प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने नटखट प्रोडक्शन्सने हाती घेतलेल्या या पहिल्या चित्रपटाच्या घोषणेकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाविषयी कोणती माहिती समोर येते, याबाबतही रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या महत्त्वपूर्ण क्षणी मान्यवर, मित्रपरिवार, चित्रपटसृष्टीतील व्यक्ती आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन नटखट प्रोडक्शन्सच्या टीमच्या वतीने करण्यात आहे.













