शेतकऱ्यांनी वेदरिंग स्टेशन, पिक विमा व दरासंबंधी प्रश्न मांडले
देवगड │ प्रतिनिधी :आंबा बागायतदारांच्या विमा नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल, असे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी आज देवगड येथे झालेल्या बैठकीत दिले.
या बैठकीत माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजप नेते बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, तहसीलदार रमेश पवार, फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास रूमडे व संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वतीने फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास रूमडे यांनी प्रास्ताविक करून समस्या मांडल्या.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत येणाऱ्या अडचणी, वेदरिंग स्टेशनवरून तयार होणाऱ्या अहवालातील त्रुटी, तसेच विमा हप्त्याच्या तुलनेत अपुरी भरपाई मिळत असल्याबद्दल तक्रारी मांडल्या. काही वेदरिंग स्टेशन बंद अवस्थेत असून त्यातून चुकीचे अहवाल दिले जातात, त्यामुळे नुकसानभरपाईची अचूकता राहत नाही, असे माजी आमदार अजित गोगटे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर पालकमंत्री राणे यांनी या मुद्यावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक आरती पाटील यांना दिले. याशिवाय, पिक विमा मिळण्याचा कालावधी १५ मे ऐवजी ३० मे करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना नामदार नितेश राणे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव केंद्र सुरू झाल्यावर दराचा प्रश्न आणि आंबा वाहतुकीच्या समस्या मार्गी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतेही फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीवर भर राहील, असे राणे यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीत बागायतदारांनी खावटी कर्ज, रायपनिंग चेंबर, आंब्याला हमीभाव, पिक विमा, वेदर स्टेशन, कीटकनाशके आणि खते यासंबंधी सविस्तर चर्चा केली. तसेच दापोली कृषी विद्यापीठाच्या संचालक मंडळात सिंधुदुर्गातील दोन प्रतिनिधी घ्यावेत आणि वेदरिंग स्टेशनवरील अहवालांची खातरजमा करताना स्थानिक व्यक्तीची सही आवश्यक ठेवावी, अशी विनंती माजी आमदार गोगटे यांनी यावेळी व्यक्त केली.











