पावसाच्या सहवासात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे!

जिल्हा परिषदेच्या गळक्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बसतोय फटका

चिपळूण : एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रंजी सुरू करण्याचा ढिंडोरा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पिटवला जात आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. अशातच चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल ३९ मराठी शाळांची विदारक अवस्था समोर आली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटूनही या शाळांची दुरूस्ती न झाल्याने विद्यार्थ्याना गळक्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे पावसाच्या सहवासात गिरवावे लागत आहेत. रस्ते, पाखाड्या, संरक्षक भिंती, स्मशानभूमी यावर करोंडोंचा निधी खर्च करणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीची शाळांबाबतची उदासीनता यातून दिसून येत आहे.

खाजगी शाळाच्या तुलनेत विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असले, तरी आजही जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट व जैसे थे आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा शिक्षणासाठीचा आधार बनून राहिल्या आहेत. मे महिन्याच्या सुट्टीनंतर १६ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला, दिमाखात सुरुवात झाली आहे. त्यामुळे खासगी प्रमाणेच जिल्हा परिषद शाळादेखिल गजबजल्या आहेत. मात्र यातील ३९ शाळा नादुरूस्त असून त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव त्या-त्या शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रासाठी जिल्हा परिषद शाळाचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये काही नादुरुस्त शाळा प्रशासनाने या निवडणुकीत तातडीने दुरुस्त केल्या होत्या. तरिही तालुक्यातील ३९ शाळा नादुरुस्त झाल्या असून त्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. शाळा दुरुस्तीमध्ये छप्पर, वर्ग खोली, खिडकी दुरुस्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र दुरूस्तीचे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गळक्या शाळांमध्येच शिकावे लागत आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोंधळे, हडकणी, कोळकेवाडी जांबराई, गोवळकोट मराठी शाळा, मुर्तवडे नंबर २, कळंबट ब्राह्मण गव्हाळवाडी, उमरोली नंबर एक, चिपळूण कन्या शाळा, पाग मुलांची शाळा, असुर्डे बनेवाडी, मार्गताम्हाणे, दहिवली खुर्द, कापरे देऊळवाडी, गांग्रई गावणंवाडी नंबर एक, पाचाड नंबर एक, गुळवणे, कुंभार्ली नंबर एक, मांडकी खुर्द, राधा नगर, वीर नंबर ४, खांदाट पुनर्वसन, विद्यामंदिर सती, पोफळी ऐनाचेतळे, नांदिवसे गावठाण, कामथे नंबर २, पिलवली तर्फे वेळंब, खेरशेत नंबर २, टाकेवाडी, कोळकेवाडी हसरेवाडी, कोळकेवाडी पठारवाडी, कोसबी घाणेकरवाडी, आगवे नंबर १, असुर्डे नंबर ३, बोरगाव नंबर १, उभळे नंबर २, नांदिवसे लुगडेवाडी या शाळांचा समावेश आहे.