रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील चांदोर येथे आंबा व्यापाऱ्यास गाडीतून ओढून मारहाण करुन सोन्याच्या चेनचे नुकसान केले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक खरात ( २२, रा. मुळ खानवली, ता. लांजा. सध्या रा. सापुचेतळे ) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी २५ रोजी रात्री 9.30 वा.सुमारास चांदोर येथे घडली.
फिर्यादी रमेश बाबू भोजे ( ४९, रा. चांदोर, दोन आंबावाडी. रत्नागिरी) यांना संशयित प्रतिक खरात याने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करुन तुम्ही माझ्या चालकाला धमकी दिली का असे विचारले त्यावेळी फिर्यादी रमेश भोजे यांनी धमकी दिली नाही असे सांगितले असता संशयित शिवीगाळ करुन त्रास देवू लागला म्हणून फिर्यादी हे संशयित प्रतिक याला ओळखत असलेल्या माणसाला मोटार घेऊन सापुचेतळे येथे भेटायला गेले. त्यावेळी संशयित प्रतिक खरात याने फिर्यादी यांची गाडी पुढे जाऊन थांबविली व संशयिताने गाडीचा दरवाजा उघडून फिर्यादी यांना बाहेर ओढले व हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी रमेश यांच्या पाठीवर, उजव्या हातावर मारहाण केली. व रस्त्यात ढकलून दिले. या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान झाले. तसेच फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी रमेश भोजे यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.












