इन्सुलीत शेतात पॉवर टिलरवर कोसळली विद्युत भारीत वाहिनी

शेतकरी बालबाल बचावला : महावितरणचा गलथानपणा पुन्हा एकदा उघड

सावंतवाडी | प्रतिनिधी : महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि गलथान कारभारामुळे आज इन्सुली गावात एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला असता मात्र, केवळ दैव बलवत्तर असल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे महावितरणचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. इन्सुली येथील शैलेश कोठावळे हे शेतकरी या घटनेत थोडक्यात बचावले आहेत.

रविवारी शैलेश कोठावळे इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ त्यांच्या शेतात काम करत असताना अचानक एक विद्युत भारीत वाहिनी त्यांच्या पॉवर टिलरवर कोसळली. सुदैवाने, ते स्वतः इलेक्ट्रिशियन असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत योग्य वेळी स्वतःला बाजूला केले आणि त्यांचा जीव वाचला. हा प्रसंग आठवून त्यांचे हात-पाय अजूनही थरथरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

विद्युत वाहिनी त्यांच्या समोर पडल्याने ते बचावले, जर ती त्यांच्या मागे पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या ४० वर्षांपासून या विद्युत वाहिन्यांकडे महावितरणने लक्ष दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर महावितरणचे फोन बंद होते आणि साधी चौकशी करण्यासाठीही कोणी आले नाही, अशी खंत कोठावळे यांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे इन्सुली गावातील जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा आणि खांबांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावातील ग्रामस्थांनी यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या दुर्लक्षाविरोधात आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत जर जीर्ण झालेले कंडक्टर आणि खांब बदलले नाहीत, तर आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या शेतातून वीजवाहक तारा गेल्या आहेत, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी आणि धोका टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच महावितरणने शेतातून गेलेल्या विद्युत वाहिन्यांना त्वरित गार्डिंग करावे अशी मागणीही त्यांनी केली.

 

चौकट –

केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो : शैलेश कोठावळे

 

” केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो, थोडा झटका बसल्यानं बाजूला झालो. विद्युत वाहीनी समोर पडली. मागे पडली असती तर अनर्थ घडला असता. ४० वर्ष विद्यूत वाहिन्यांकडे बघितही नाही. यातूनच आजची दूर्घटना. प्रसंग आठवून हात-पाय अजूनही कापतायत. महावितरणचे फोन बंद, साधे चौकशीलाही कोणी आले नाही”

-शैलेश कोठावळे, सुदैवानं बचावलेले शेतकरी