कोत्रेवाडी ग्रामस्थांचा निर्धार
लांजा (प्रतिनिधी) डम्पिंग ग्राउंड रद्द च्या मागणीसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उद्या मंगळवारी ८ जुलै रोजी छेडलेले लाक्षणिक उपोषण न भूतो न भविष्यती करण्याचा एकमुखी निर्धार कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित आहे. प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नसताना तसेच जलस्रोत जवळ असताना आणि लोक वस्तीपासून अगदी १८० ते २०० मीटरवर हा प्रकल्प राबवला जात असल्याने कोत्रेवाडी ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला आहे .गेल्या चार वर्षांपासून कोत्रेवाडी ग्रामस्थ या डंपिंग रद्दसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र तरी देखील लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून जोर जबरदस्तीने हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणूनच कोत्रेवाडी ग्रामस्थांना देशोधडीला लावणारा हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प हद्दपार व्हावा यासाठी मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलेले आहे .
सनदशीर आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन छेडण्यात येणार आहे .आम्हाला डम्पिंग ग्राउंड प्रकल्प नकोच अशी आक्रमक भूमिका कोत्रेवाडी ग्रामस्थ, महिला ,तरुण वर्ग यांनी घेतलेली आहे. हा प्रकल्प चांगला आहे असे म्हणणाऱ्यांनी तो
आपल्या प्रभागात, जागेत न्यावा. परंतु आम्हा कोत्रेवाडी ग्रामस्थांना उध्वस्त करू नका ,अशी भूमिका कोत्रेवाडी ग्रामस्थांची आहे. मंगळवारी छेडण्यात आलेले या उपोषणाची संपूर्ण तयारी झाली असून प्रशासनाकडून जोवर लेखी स्वरूपात ठोस उत्तर दिले जात नाही, त्या तोपर्यंत या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पा विरोधात सनदशीर मार्गाने आपले आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे .
त्यामुळे मंगळवारी छेडण्यात आलेले हे डम्पिंग ग्राउंड विरोधातील आंदोलन लक्षवेधी आणि न भुतो न भविष्यती असे ठरणार असा विश्वास देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे










