*दशावतार * या लवकरच पडद्यावर येऊ घातलेल्या मराठी चित्रपटाची पहिली झलक नुकतीच लोकांसमोर आली… आणि आत्तापासूनच या चित्रपटाविषयी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. केवळ मराठी चित्रपट सृष्टीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात , भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाची तुफान चर्चा होताना दिसत आहे.
जगभरातील चित्रपटांविषयी सांगोपांग चर्चा करणारे अमेरिकेतील प्रसिद्ध समीक्षक/ content creator कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी *दशावतार* या मराठी चित्रपटाच्या पहिल्या लुकविषयी आपल्या “अवर स्टुपिड रिॲक्शन “ या प्रसिद्ध कार्यक्रमात चर्चा केली. त्यांच्या कार्यक्रमात चर्चिला जाणारा *दशावतार* हा पहिलाच मराठी आणि किंबहुना पहिला भारतीय प्रादेशिक चित्रपट असावा. मराठी भाषा आपला अटकेपार झेंडा मिरवत असतानाच मराठी चित्रपटदेखिल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवत आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब आहे.
12 सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर झळकणार असलेल्या *दशावतार* या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असून कोकणच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या , आपली कला आणि आपला निसर्ग जपणार्या एका मनस्वी कलावंताची ही कथा आहे… दशावतार!!!
झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला असा चित्रपट आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे हे आहेत.











