माजी सरपंच देवानंद पालांडे यांचा स्तुत्य उपक्रम
वैभववाडी प्रतिनिधी : उपळे गावचे माजी सरपंच देवानंद बाळकृष्ण पालांडे यांच्यामार्फत गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप करण्यात आले. श्री पालांडे यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपळे नं. १ या प्रशालेत विद्यार्थ्यांना वृक्ष व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश नारकर यांनी श्री देवानंद पालांडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी देवानंद पालांडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात ध्येय निश्चित केले पाहिजे. मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना यापुढे देखील शैक्षणिक सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण तावडे तर आभार सरिता पाटील यांनी मानले.












