
कलंबिस्त । प्रतिनिधी : दिशा फाऊंडेशन आणि कलंबिस्त इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तिन्ही गटांतून श्रावणी सचिन राणे, आकांक्षा बाबाजी धोंड आणि मयुरी बाळकृष्ण नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. समाजामध्ये गरजू घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
बुधवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षकांची जबाबदारी भरत गावडे, महेश पेडणेकर आणि किशोर वालावलकर यांनी पार पाडली.
गटनिहाय विजेते
* पहिली ते चौथी गट: या गटात सांगेली घोलेवाडीची श्रावणी सचिन राणे प्रथम आली, तर शिरशिंगे नं. १ ची अन्वी पांडुरंग राऊळ द्वितीय आणि वेर्ले नं. ३ चा वेद विठ्ठल बिड्ये तृतीय क्रमांकावर राहिला. सांगेली सनामटेंबच्या अर्णवी अनिल सनामला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
* पाचवी ते सातवी गट: या गटात शिरशिंगे नं. १ ची आकांक्षा बाबाजी धोंड प्रथम आली. वेर्ले नं. १ ची सार्था विठ्ठल बिड्ये द्वितीय, तर शिरशिंगे नं. १ ची अन्वी अजित देसाई तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सांगेली हायस्कूलच्या गतिक धाकू जंगलेने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
* आठवी ते दहावी गट: या गटात सांगेली हायस्कूलची मयुरी बाळकृष्ण नाईक प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. शिरशिंगे हायस्कूलची अक्षरा अनिल राऊळ द्वितीय, तर कलंबिस्त हायस्कूलची माधुरी महेश राऊळ तृतीय आली. सांगेली हायस्कूलच्या शमिका संतोष धर्णेला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी दिशा फाऊंडेशनचे सचिव श्री. दीपक राऊळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. १९९३-९४ च्या दहावीच्या बॅचने २०२३ मध्ये समाजातील गरजू लोकांसाठी ही संस्था स्थापन केली. “भगवंताने आपल्याला दोन हात दिले असले, तरी दान देण्याची दृष्टी आपल्यालाच कमवावी लागते,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मानवता धर्म जपण्याचा आणि ‘उत्तम वक्तृत्व हेच उत्कृष्ट नेतृत्व’ असल्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलंबिस्त प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. किशोर वालावलकर यांनी केले, तर सहसचिव सौ. विनिता कविटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला दिशा फाऊंडेशनचे पदाधिकारी, मान्यवर, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













