असनियेत विद्युतभारीत वाहिनी कोसळून बैल ठार

स्थानिक आक्रमक : कनिष्ठ अभियंता धारेवर

बांदा : प्रतिनिधी

असनिये – वायंगणवाडी येथे विद्युतभारीत वीज वाहिनी गायीच्या पाड्यावर कोसळल्याने तो जागीच गतप्राण झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. महावितरणचा हलगर्जीपणा व बोगस कामांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. महावितरणचे बांदा २ चे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांना स्थानिकांनी चांगलेच धारेवर धरले.

असनिये, भालावल पंचक्रोशीत कायमच विजेचा बोजवारा उडालेला असतो. याठिकाणी सन १९८४ मध्ये वीजवाहिन्यांचे काम झाले होते. त्यानंतर ४० वर्षे उलटली तरीही वीजवाहिन्या तसेच पोलवरील गांजलेले साहित्य अद्याप बदललेले नाही. त्यामुळे वारंवार वीज समस्या निर्माण होतात. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तात्पुरता मुलामा चढविण्यात येतो. मात्र, मूळ समस्या कायम राहते अशी तक्रार स्थानिकांनी यावेळी शाखा अभियंता ठाकूर यांच्याकडे केली.

चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी पोल मोडून लाइन पडली होती. त्याची तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. स्थानिक शेतकरी लक्ष्मण वासुदेव सावंत यांनी रोजच्या प्रमाणे आपली गुरे चरावयास सोडली होती. सायंकाळच्या सत्रात विद्युत भारित वीजवाहिनी गाईच्या पाडसावर पडली व तो जागीच गतप्राण झाला. अन्य गुरेही त्याच ठिकाणी होती. शेतकरी लक्ष्मण सावंत यांनी प्रसंगावधान राखल्याने ते या दुर्घटनेतून बालंबाल बचावले.

सरपंच रेश्मा सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत पंचनामा करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. कनिष्ठ अभियंता ठाकूर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, ग्रामस्थांच्या कोणत्याही प्रश्नांना ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत.