वाळपई येथील श्रावण बर्वे खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पणजी :
वाळपई, गोवा येथील आंबेडे गावातील श्रावण बर्वे खून प्रकरणातील आरोपी उदय बर्वे याला पणजी येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश श्रीमती क्षमा जोशी यांनी सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे सावंतवाडी येथील ॲड. बाळाजी बाबूराव रणशूर यांनी काम पाहीले.

याबाबत हकिकत अशी की, श्री. देविदास वामन बर्वे हे आपली पत्नी, मोठा मुलगा उदय व लहान मुलगा श्रावण यांचेसह आजोबानगर, होंडा, सत्तरी, गोवा येते राहत होते. त्यांचे गाव माजे आंबेडे येथे दुसरे घर असून त्या ठिकाणी त्यांची बागायत आहे. त्याकडे लक्ष देणेसाठी लहान मुलगा श्रावण हा आंबेडे, वाळपई येथे रहात होता. देवीदास दररोज सकाळी होंडा येथून आंबेडे येथे जात असत.

दि.१५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०८.४५ वाजता जेव्हा देवीदास आंबेडे येथील आपल्या बागेत आले तेव्हा त्यांनी श्रावण हा घराच्या बाहेर अचल स्थितीत पडलेला बघितला. त्याच्या गळ्याभोवती नायलॉन दोरी बांधलेली होती. अंगावर डाव्या गालावर, उजव्या हातावर व पायावर जखमा होत्या. देवीदासने त्याच्या गळ्याभोवतीचा नायलॉन दोर सोडला आणि त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला व तो काहीच प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शेजारी राहणाऱ्या आपल्या भावाला बोलावून घेतले. श्रावण हा मयत असलेची सर्वांना खात्री झालेवर त्यांना पोलीसांना खबर दिली.

चौकशीत पोलीसांनी आंबेडे येथील वासुदेव ओझरेकर याला दि.१९/०४/२०२५ रोजी ताब्यात घेतले. वासुदेव याने आपण श्रावणचे वडील देविदास व भाऊ उदय याच्याच सहाय्याने आणि संगनमताने श्रावणाचा दोराने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. करीता पोलीसांनी श्रावणाचे वडील देविदास व भाऊ उदय याला त्याच दिवशी अटक केली. दि.२९ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस

कस्टडीत राहिल्यानंतर त्यांना कोळवाळ येथील सेंट्रल जेल येथे ठेवण्यात आलेले होते. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३, ६१(१), २३८ व ३(५) असे आरोपी ठेवणेत आलेले आहे.

आरोपी उदय बर्वे यांचेतर्फे ॲड. रणशूर यांनी पणजी येथील सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज केला होता. सदर कामी युक्तीवाद करता ॲड. रणशूर यांनी आरोपीला अटक होऊनही दोन अडीच महिने झाले तरी आरोपी विरुद्ध पोलीस कोणताच पुरावा मिळवू शकलेले नाहीत. श्रावण व आरोपी यांचे संबंध खूप चांगले होते. त्यामुळे आरोपीने श्रावण यास मारले किंवा त्याच्या खुनात आरोपीचा सहभाग होता या पोलीसांच्या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. आरोपीस विनाकारण जेलमध्ये ठेवणेत आलेले आहे. आणि आरोपीचे विरुद्ध यापुर्वी कोणतेच पोलीस रेकॉर्ड नाही. आरोपी हा गोव्यातील रहीवासी असलेने तो पळून जाण्याचा प्रश्न येत नाही. उपरोक्त युक्तीवाद ग्राह्य मानून पणजी येथील अतिरीक्त (Additional Session Judge) सत्र न्यायाधीश श्रीम. क्षमा जोशी यांनी आरोपी यास पंचवीस हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी ॲड.बी.बी. रणशूर यांना ॲड. संजय परब व ॲड. गुरु राणे यांनी सहाय्य केले.