बांद्यात गोवा बनावटीची दारू जप्त, दोघांना अटक
बांदा: गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन तरुणांना बांदा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री बांदा देऊळवाडी येथे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ₹१,४५,६८० किमतीची गोवा बनावटीची दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ₹५ लाखांची चारचाकी, असा एकूण ₹६,४५,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची माहिती बांदा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, बांदा पोलिस कर्मचारी प्रसाद पाटील, ज्ञानेश्वर हळदे आणि राजाराम कापसे यांनी देऊळवाडी येथे सापळा रचला. रात्री ११.४० च्या सुमारास पत्रादेवी येथून बांदा देऊळवाडीकडे येणारी एक मारुती सुझुकी बॅलेनो (एमएच ०७ एएस ०१९४) दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आतील दोन्ही तरुणांनी गाडी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील आणि ज्ञानेश्वर हळदे यांनी शिताफीने दोघांना पकडले.
गाडीची तपासणी केली असता, त्यात रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्कीच्या ७५० मिली मापाच्या ८५२ बाटल्या (अंदाजे किंमत ₹१,१९,२८०) आणि इम्पीरिअल ब्ल्यू हँड पिक ग्रेन व्हिस्कीच्या २ लिटर मापाच्या ३० बाटल्या (अंदाजे किंमत ₹२६,४००) असा दारूचा साठा आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी सुजल सचिन पवार (२१, रा. तेर्सेबांबर्डे, गवसवाडी, ता. कुडाळ) आणि सुमित विकास कुडाळकर (१९, रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा) या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांदा पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि पोलिस सहायक निरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांनी ही कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.














