टॅक्सी चालकावर हल्ला करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

पुणे आणि पंढरपूरपर्यंत धागेदोरे

पेडणे : मालपे, पेडणे येथे टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला करून सावंतवाडीत चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पेडणे आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी संयुक्त तपास करून पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी जुना गोवा पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, एक अल्पवयीन संशयित यापूर्वीच पेडणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

बुधवारी रात्री, कळंगुट, गोवा येथून टॅक्सी भाड्याने घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या संशयितांनी मालपे येथे टॅक्सी चालक संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर हल्ला केला. वेंगुर्लेकर यांनी प्रतिकार केल्यानंतर संशयितांनी सावंतवाडीच्या दिशेने पळ काढला. जखमी वेंगुर्लेकर यांच्यावर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.
याच संशयितांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सावंतवाडी शहरात धुमाकूळ घातला. त्यांनी शिल्पग्राम परिसरातून दोन मोटरसायकली, हेल्थ पार्क येथील झोपलेल्या कामगारांचे मोबाईल आणि जेलमागे असलेल्या श्रमविहार कॉलनीतील एका बंगल्यातून चोरी केली.
या घटनेनंतर गोवा पोलीस तात्काळ संशयितांच्या शोधात सावंतवाडीत दाखल झाले. गोवा पोलीस सावंतवाडीत पोहोचण्यापूर्वीच संशयितांनी पलायन केले होते. सावंतवाडीत चोरीला गेलेली एक मोटरसायकल कणकवली शिवडाव येथे सापडल्याने चोरटे कणकवलीच्या दिशेने गेल्याचा पोलिसांचा अंदाज होता. सावंतवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने तपास सुरू केला. सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा आणि अन्य ठिकाणी पथके पाठवून शोधमोहीम तीव्र केली. अखेर, जुना गोवा येथे दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणातील एक अल्पवयीन संशयित यापूर्वीच पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्याला शुक्रवारी बाल न्यायालयात हजर करण्यात आले असून, तेथून त्याला मेरशी येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

आंतरराज्य टोळीचा सहभाग
पोलिसांच्या माहितीनुसार, ही एक मोठी आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून, तिचे धागेदोरे पुणे, कोल्हापूर आणि पंढरपूरपर्यंत जोडले असल्याची शक्यता आहे. या तपासातून अनेक चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेडणे पोलीस या प्रकरणाबाबत शनिवारी सविस्तर खुलासा करणार आहेत. गोवा पोलीसही या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहेत.