रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात ‘लिओ’ चे दिमाखात आगमन !

रत्‍नागिरी | प्रतिनिधी
जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकात अत्‍यंत हुशार व चपळ समजल्या जाणाऱ्या बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याचे बारसे करण्यात आले असून पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी या श्वानाचे ‘‘लिओ’’ असे नामकरण केले आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित एका विशेष विशेष कार्यक्रमात हे नामकरण करण्यात आले.

बेल्जियन मालिनॉइस ही जात अफाट कार्यक्षमता, तीक्ष्ण बुध्दिमत्ता आणि धाडसासाठी जगभरातील सुरक्षा दलांमध्ये प्रसिध्द आहे. रत्‍नागिरी पोलिस श्वान पथकात या जातीचा श्वान पहिल्यांदाच दाखल झाल्यामुळे गुन्हे अन्वेषण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कामात पोलिस दलाची ताकद अधिक वाढणार आहे. यावेळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि श्वान पथकाचे मार्गदर्शक उपस्थित होते. नव्याने दाखल झालेला हा ‘‘लिओ’’ आगामी काळात पोलिस प्रशासनाला गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी आणि विविध आव्हानात्‍मक मोहिमांमध्ये मोलाची मदत करेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.