चिपळूण (प्रतिनिधी) : शिक्षण मंडळ, कराड या शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या कै. द. पां. तथा बाळासाहेब पाठक स्मृति आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्काराने पी. के. सावंत विद्यालय अडरे ता. चिपळूण येथील निवृत्त मुख्याध्यापक सुषमा इंदुलकर यांना गौरविण्यात आले.
सुषमा इंदुलकर या दि. २३ मार्च २०२३ रोजी पी.के. सावंत विद्यालय, अडरे, ता. चिपळूण या विद्यालयातून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या. मराठी विषयातून एम. ए., एम. एड. पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुषमा इंदुलकर यांनी पी. के. सावंत महाविद्यालयात ३६ वर्षे अध्यापनाचे काम केले. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत अभ्यासू, विचारसंपन्न आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. साने गुरुजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या राष्ट्र सेवा दल या संघटनेत त्यांची जडणघडण झाली. श्रमिक सहयोग या वंचित समाजातील मुलांच्या प्रयोगशील शिक्षणाचे काम करणाऱ्या संस्थेच्या त्या संस्थापक गटातील सदस्य व विद्यमान कार्यवाह आहेत. कराड येथील टाऊन हॉलमध्ये गुरुवार दिनांक १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या गुरुगौरव समारंभात कृष्णा विश्व विद्यालय कराडचे कुलपती डॉ. सुरेश (बाबा) भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शिक्षण मंडळ, कराडचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देवार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाइस चेअरमन अनघा परांडकर, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील अनेक शिक्षणप्रेमी मंडळी उपस्थित होती.











